सातारा, दि.28 (जिमाका) : जिल्ह्यातील प्रत्येक कोविड रुग्णालयात पूर्ण वेळ ऑडिटर नेमावेत तसेच मोठ्या गावात 30 बेडचे रुग्णालय सुरु करावे, कोविड सेवेतले कर्मचारी सोडून इतर अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर विविध जबाबदाऱ्या द्या. येत्या काही दिवसात कोरोना संसर्ग साखळी तुटली पाहिजे अशा पद्धतीने नियोजन करा अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या.
येथील जिल्हा परिषदेच्या स्व. यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय हॉलमध्ये आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जिल्ह्यातील कोरोना संसर्गाचा आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीला सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री राजेश टोपे, पालकमंत्री बाळासाहेब पाटील, गृह राज्यमंत्री (ग्रामीण) शंभूराज देसाई, खासदार श्रीनिवास पाटील, खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर, माजी मुख्यमंत्री तथा आमदार पृथ्वीराज चव्हाण, आमदार अरुण लाड, आमदार मकरंद पाटील, आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार जयकुमार गोरे, आमदार दिपक चव्हाण, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय कबुले, जिल्हाधिकारी शेखर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल आदी उपस्थित होते.
गृह विलगीकरणामुळे संपूर्ण कुटुंब बाधित होत आहेत. यामुळे जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. गृह विलगीकरण बंद करुन कोरोना संसर्ग झालेल्या व्यक्तींचे संस्थात्मक विलगीकरण करण्यात यावे, अशा सूचना करुन उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, कोरोना रुग्णाच्या संपर्कात आलेल्यांचा 24 तासात शोध लावून त्यांची पहिल्यांदा कोरोना चाचणी करावी. जिल्ह्यात कडक निर्बंध लावले आहेत. तरीही काही नागरिक बेजबाबदारपणे बाहेर फिरत आहेत, अशांवर पोलीस विभागामार्फत कडक कारवाई करावी.
शासकीय तसेच खासगी कोविड रुग्णालयांचे ऑक्सिजन, फायर, तसेच इलेक्ट्रिक ऑडिट करा. हे ऑडिट सातत्याने करावे, अशा सूचना करुन उपमुख्यमंत्री अजित पवार पुढे म्हणाले, साखर कारखान्यांनी ऑक्सिजन प्लॅन्ट सुरु करावे, यासाठी त्यांच्यासोबत बैठका घ्या. आमदारांना कोरोना संसर्गाबाबत 1 कोटीपर्यंत निधी खर्च करण्याची मुभा देण्यात आली आहे. त्यांनी त्यांचा निधी योग्य पद्धतीने खर्च करावा. प्रत्येक नागरिकाला योग्य पद्धतीने उपचार मिळावेत यासाठी राज्य शासन निधीची कमतरता पडू देणार नाही, असे आश्वासनही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बैठकीत दिले.
जास्तीत जास्त नागरिकांची आरटीपीसीआर चाचणी करण्यावर भर द्यावा. गृह विलगीकरणातील कोरोना रुग्ण संस्थात्मक विलगीकरणात हलवावे, प्रामुख्याने याची ग्रामीण भागात प्रभावी अंमलबजावणी करावी. जे कोरोना केअर बंद केले आहेत त्यांना सुरु करुन तेथे येणाऱ्या प्रत्येक रुग्णाची जेवण्याची चांगली व्यवस्थेबरोबर त्यांच्यावर चांगल्या पद्धतीने औषधोपचार करावेत. ज्या कोरोना संसर्ग झालेल्या रुग्णांवर महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजनेंतर्गत उपचार घेतले आहेत, परंतु जी प्रकरणे प्रलंबित आहेत अशी प्रकरणे तात्काळ मंजूर केली जातील, असे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री राजेश टोपे बैठकीत सांगितले.
कोरोना संसर्गाची तिसरी लाट येणार असल्याचा अंदाज तज्ञ व्यक्त करीत आहे. या लाटेचा सामना करण्यासाठी जिल्ह्यात आरोग्य सुविधा वाढविण्यावर भर देत असल्याचे पालकमंत्री बाळसाहेब पाटील यांनी या बैठकीत सांगितले.
बैठकीच्या अनुषंगाने गृह (ग्रामीण) राज्यमंत्री शंभूराज देसाई, खासदार श्रीनिवास पाटील, खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर, माजी मुख्यमंत्री तथा आमदार पृथ्वीराज चव्हाण, आमदार अरुण लाड, आमदार मकरंद पाटील, आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार जयकुमार गोरे, आमदार दिपक चव्हाण यांनीही उपयुक्त अशा सूचना केल्या.
या बैठकीमध्ये जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी कोरोना संसर्गाबाबत जिल्हा प्रशासन राबवित असलेल्या उपाययोजनांची माहिती संगणकीय सादरीकरणाद्वारे दिली.
या बैठकीला अपर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल थोरवे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.