सातारा, वृत्तसंस्था । करोना काळानंतर गेल्या दीड वर्षांपासून बंद असलेल्या शाळांचा दरवाजा सोमवारी (दि. ४) उघडला जाणार आहे. परिणामी २२८0 शाळांची घंटा वाजणार असून यासाठी जिल्हा परिषद, जिल्हा प्रशासन आणि गावपातळीवर कार्यरत ग्रामशिक्षण समितींनी आवश्यक ती तयारी सुरु केली आहे.
जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील पाचवी ते बारावीपर्यंतच्या २ हजार ८८ तर शहरी भागातील आठवी ते बारावीच्या १९२ शाळा असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी धनंजय चोपडे यांनी दिली.
जिल्ह्यात फेब्रुवारी २0२0 पासून शाळा, कॉलेज बंद आहेत. शाळांचे निकाल जुन्या निकालांच्या आधारे लावण्यात आले. दहावी आणि बारावी परीक्षांचे निकाल नववी आणि अकरावीच्या गुणांवर आधारित देण्यात आले. दरम्यान, २०२१ मध्ये काही प्रमाणात महाविद्यालये सुरु झाली असली तरी त्यामध्ये सातत्य नव्हते. करोनाची भीती अजूनही मनातून गेलेली नाही.
काही दिवसांपासून जिल्हा अनलॉक झाल्यानंतर मात्र, बहुतांशी व्यववहार सुरळीत झाले आहेत. त्यामुळे शाळा सुरु कराव्यात, अशी मागणी जोर धरु लागली होती. त्यानुसार सप्टेंबर महिन्यामध्ये त्या अनुषंगाने गावपातळीवर सर्वेक्षण करण्यात आले आणि २४४२ शाळांची घंटा वाजू शकते, यावर शिक्कामोर्तब झाले. त्यामुळे जिल्हा परिषद आणि प्रशासनाने यावर आवश्यक त्या उपाययोजना करत त्यासाठी गाईडलाईन निश्चित केली आहे. त्यानुसार या शाळा सुरु होणार आहेत.
शहरी भागातील फक्त 78 हजार विद्यार्थ्यांना मिळणार सध्या शिक्षण
जिल्ह्यात ग्रामीण भागात पाचवी ते आठवीपर्यंतच्या २0८८ शाळा सुरु होणार असून याची विद्यार्थी संख्या २ लाख ६ हजार ५३ इतकी आहे. शहरी भागात आठवी ते बारावीपर्यंतच्या १९२ शाळा सुरु होणार असून यासाठीची विद्यार्थी संख्या ७८ हजार ८0८ इतकी आहे.