भुसावळ : प्रतिनिधी
महिलेची फसवणूक करून गाळे खरेदीस टाळाटाळ केल्या प्रकरणी येथील माजी प्रभारी नगराध्यक्ष अनिल चौधरी यांनी आधी महिलेचे ६० लाख ७० हजार रूपये अदा करावेत, नंतरच जामीनसाठी अर्ज करावा असे निर्देश सर्वाच्च न्यायालयाने दिले आहेत. दरम्यान, पैसे भरण्यासाठी आज शेवटचा दिवस आहे. यावर आता अनिल चौधरी काय भूमिका घेतात यावर लक्ष लागुन आहे.
याबाबत वृत्त असे की, भुसावळ येथील सनांसे नामक महिलेकडून रुपये ६० लाख ७० हजार रुपये घेऊन शहरातील एका व्यापारी संकुलातील गाळे खरेदी करून न देता फसवणूक केल्याप्रकरणी अनिल चौधरी यांच्यावर भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशन येथे कलम ४२०, ५०४, ५०६ अंतर्गत गुन्हा दाखल झालेला आहे.
या प्रकरणी अनिल चौधरी यांचा अटकपूर्व जामीन अर्ज जिल्हा व सत्र न्यायालय तसेच उच्च न्यायालयाने कडक ताशेरे ओढत फेटाळला होता. दरम्यान, २२ जानेवारी पासून पोलिस तपास यंत्रणेने अनिल चौधरी यांना फरार घोषित केले होते. त्यानंतर अनिल चौधरी यांनी अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. या प्रकरणी दिनांक २१ मे रोजी सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीत न्यायालयाने स्पष्ट मत नोंदवले की सदर प्रकरणात असलेली वस्तुस्थिती व उच्च न्यायालयाने नोंदवलेले निरीक्षण पाहता तुम्ही आधी १९ऑक्टोबर २०१९ रोजी घेतलेली संपूर्ण रक्कम ६० लाख ७० हजार रुपये संबंधित दिवाणी न्यायालयात दिनांक २४ मे पर्यंत जमा करा त्यानंतरच तुमच्या जामीन अर्जावर विचार करु अन्यथा सदरचा अर्ज रद्द करण्यात येईल. त्यामुळे आता अनिल चौधरींनी घेतलेली व्यवहारातील मूळ रक्कम ते संबंधित दिवाणी न्यायालयात भरतात किंवा कसे यावर सर्वांचे लक्ष लागून राहिलेले आहे जर त्यांनी पैसे भरल्यास संबंधित जामीन अर्जावर दिनांक २५ मे रोजी सुनावणी होईल असे न्यायालयाच्या निकालपत्रात नमूद केले आहे. यामुळे आज ते पैसे भरणार का ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
गेल्या सहा महिन्यापासून अनिल चौधरी हे शहरातून पोलिस यंत्रणेच्या रडारवर फरार घोषित केलेले असून आज सर्वाच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार पैसे भरल्यास त्यांच्या जामीन अर्जावर उद्याच्या दिवशी सुनावणी होणार आहे. अनिल चौधरी पैसे भरतात की नाही? याकडे त्यांच्या समर्थकांसह विरोधकांचेही लक्ष लागले असून येत्या सहा महिन्यात भुसावळ नगरपालिकेच्या निवडणूका येत असून त्यांच्या जामीन अर्जावर काय निर्णय होतो. याकडे राजकीय धुरीणाचे लक्ष लागून आहे.