शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालयात विविध विकास कामांचे उद्घाटन

0
3

जळगाव  : प्रतिनिधी
जिल्ह्यातील वैद्यकीय क्षेत्रातील विकासासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाने यशस्वीपणे वाटचाल सुरू केली आहे. यामुळे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना सुविधा मिळत असून डॉक्टरांसह परिचारिका, कर्मचाऱ्यांचे मनोबल उंचावलेले आहे. ही बाब निश्चितच कौतुकास्पद व प्रेरणादायी आहे, असे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केले.
येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात विविध विकासकामांचे उदघाटन पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांचे हस्ते झाले. प्रसंगी जिल्हाधिकारी अभिजित राऊत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया, महानगरपालिकेचे आयुक्त सतीश कुलकर्णी, अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. किरण पाटील,  उप अधिष्ठाता डॉ. मारोती पोटे व डॉ. किशोर इंगोले, वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजय गायकवाड, उप वैद्यकीय अधीक्षक डॉ. योगिता बावस्कर, प्रशासकीय अधिकारी डॉ. जितेंद्र सुरवाडे, अधिसेविका प्रणिता गायकवाड आदी  उपस्थित होते.
सुरुवातीला अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी पालकमंत्री ना. पाटील यांचे पुष्पगुच्छ देत स्वागत केले. त्यानंतर  जिल्हा नियोजन समितीद्वारे मंजूर सामान्य नागरिकांसाठीचे प्रसाधनगृह व शौचालय, दंतशल्यचिकित्सा कक्षाचे नूतनीकरण तसेच श्रवण क्षमता तपासणी कक्षाचे उदघाटन पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केले. याप्रसंगी पालकमंत्री यांनी रुग्णालयातील शिस्तबद्ध  नियोजन पाहून कौतुक केले. अधिष्ठाता डॉ. रामानंद यांनी त्यांना विविध प्रकल्पांची, योजनांची माहिती दिली.
यानंतर सूक्ष्मजीवशास्त्र विभागाच्या म्यूजियमचे आणि विद्यार्थ्यांसाठीच्या प्रसाधनगृहाचे पालकमंत्री ना. पाटील यांनी उदघाटन केले. यानंतर पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील म्हणाले की, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांसाठी आता विविध सोयी-सुविधा उपलब्ध झालेले आहेत. यामुळे निश्चितच गैरसोय दूर झालेली असून डॉक्टर व त्यांच्या सहकाऱ्यांचे कौतूक आहे. विद्यार्थ्यांसाठी असणारे म्युझियम देखील त्यांच्या अभ्यासाला उपयोगी पडणारे आहे, असेही ते म्हणाले.
याप्रसंगी उपअभियंता सुभाष राऊत, जिल्हापेठ पोलिस स्टेशनचे निरीक्षक रामदास वाकोडे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख, प्राध्यापक, डॉक्टर, अधिकारी, कर्मचारी, परिचारिका आदी उपस्थित होते. कार्यक्रमासाठी विविध विभागांच्या जनसंपर्क सहायक विश्वजीत चौधरी यांचेसह एसएमएस निरीक्षक अजय जाधव,  प्रकाश पाटील, मंगेश बोरसे, जितू करोसिया, सुधीर करोसिया आदींनी परिश्रम घेतले.
दंतशल्यचिकित्सा विभागाचे नूतनीकरण
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील कक्ष क्रमांक २१४ येथे दंतशल्यचिकित्सा विभागाचे नूतनीकरण बुधवारी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांचे हस्ते करण्यात आले. प्रसंगी ना. पाटील यांना विभागप्रमुख डॉ.इम्रान पठाण यांनी माहिती दिली.  पूर्वी एका खुर्चीवरच दंततपासणी व उपचार केले जात होते. आता पाच खुर्च्या तयार झाल्या असून एकावेळी पाच रुग्णांवर उपचार करता येतील. तसेच कोरोना तपासणीकरिता नमुना देण्याचा स्वतंत्र विभागही येथे तयार करण्यात आला आहे. ओपीडीकाळात ज्या रुग्णांना कोरोना तपासणी संदर्भित केली आहे, त्यांना नमुना देता येणार आहे. दंतशल्यचिकित्सा विभागात तोंडाचे कर्करोग, दातांची तपासणी, मुख रोग तपासणी, कवळ्या बसविणे, दात बसविणे, अक्कलदाढीचे ऑपरेशन, रूट केनल, दात स्वच्छ करणे अशा सेवा रुग्णांना दिल्या जात आहेत.
सूक्ष्मजीवशास्त्र विभागाच्या म्युझियमचे उदघाटन
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील सूक्ष्मजीवशास्त्र विभागातर्फे अत्याधुनिक केबिनबंद म्यूजियम तयार करण्यात आले आहे. या म्यूजियमचे उदघाटन बुधवारी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केले. या म्यूजियममध्ये विविध विषाणू-जिवाणू यांचा अभ्यास करणे विद्यार्थ्यांना सोपे जाणार आहे. केवळ वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांनाच नव्हे तर इयत्ता १० वी ते १२ वीच्या विद्यार्थ्यांना देखील या म्यूजियमचा लाभ घेता येणार आहे. विविध आलेखाच्या पद्धतीने विद्यार्थ्यांना समजण्यास सोपे जावे अशी मांडणी या म्यूजियममध्ये करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना जेव्हा आवश्यकता वाटेल तेव्हा या म्यूजियमचा वापर त्यांना करता येणार आहे. म्यूजियमची संकल्पना विभागप्रमुख डॉ. किशोर इंगोले यांची असून त्यांना भाग्यश्री पाटील व सहकाऱ्यांनी मदत केली आहे.
श्रवण क्षमता तपासणी कक्षाचे उदघाटन
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील नाक-कान-घसा विभागातर्फे श्रवण क्षमता तपासणी कक्षाचे (ऑडिओमेट्री रूम) बुधवारी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांचे हस्ते फित कापून उदघाटन झाले. कर्णबधिर दिव्यांग बांधवांना तपासणी करण्यासाठी धुळे येथे जावे लागे. मात्र आता जळगावातच सुविधा झाल्याने कर्णबधिर दिव्यांगांची तपासणी श्रवण क्षमता तपासणी यंत्र व बेरा मशीनद्वारे होत आहे. अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी पाठपुरावा करीत कान-नाक-घसा विभागात या मशीन उपलब्ध करून घेतल्या आहेत. विभागप्रमुख डॉ. अक्षय सरोदे यांचेसह डॉ. विनोद पवार, स्पीच थेरपिस्ट डॉ. राजश्री वाघ, ऑडिओलॉजिस्ट मुनज्जा शेख हे रुग्णांची तपासणी करीत सेवा देत आहेत.
शौचालयांमुळे कुचंबणा झाली दूर
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दोन शौचालय व प्रसाधनगृहांची बांधकामे पूर्ण झाली असून त्यांचे पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांचे हस्ते उदघाटन झाले. यावेळी अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी त्यांना माहिती दिली. गेट क्र. २ जवळील वाहनतळामध्ये रुग्ण, त्यांचे नातेवाईक यांचे सोयीसाठी शौचालय व प्रसाधनगृह बांधण्यात आले आहे. रुग्ण, नातेवाईक यांची होणारी कुचंबणा लक्षात घेता अधिष्ठाता डॉ. रामानंद यांनी पालकमंत्री ना. पाटील यांचेकडे शौचालय व प्रसाधनगृहासाठी पाठपुरावा केला होता. त्यानुसार  या बांधकामासाठी पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हा नियोजन समितीने प्रकरण  मंजूर करीत त्यासाठी २४ लाख रुपयांचा निधी दिला होता. हे शौचालय, प्रसाधनगृह अस्तित्वात आले आहे. तसेच, शरीरक्रियाशास्त्र विभागाजवळ वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांसाठी अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी पुढाकार घेऊन महाविद्यालयाच्या निधीतून शौचालय, प्रसाधनगृह यांचे बांधकाम करून घेतले. त्यासाठी २५ लाख ४५ हजार ८५२ रुपयांचा निधी लागला आहे. याठिकाणी अत्याधुनिक स्वरूपाचे शौचालय, प्रसाधनगृह तयार झाले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी असणारा शौचालयाचा प्रश्न मार्गी निघाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here