जळगाव प्रतिनिधी । विवाहितेच्या आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पतीसह सहा जणांविरोधात शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे..
शहरातील गुरूनानक नगरात दिनेश बदलू लोहाळेकर हे आपल्या पत्नी नंदा लोहाळेकर (वय-४०) यांच्यासह राहतात. नंदा लोहाळेकर खासगी नोकरीला आहे. ८ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास नंदा यांनी आणलेल्या पगारावरून त्यांचे पती दोन जेठ आणि दोन्ही जावा यांनी शिवीगाळ व मारहाण करून जीवे ठार मारण्याची धमकी दिली. त्यानंतर १३ ऑक्टोबर रोजी सकाळी पाचच्या सुमारास नंदा यांनी देवीच्या पूजेसाठी पती दिनेश यांच्याकडून ५० रुपये मागितले होते. याचा राग आल्याने पती दिनेश याने नंदा यांना शिवीगाळ केली. याला कंटाळून विवाहित नंदा लोहाळेकर यांनी सकाळी ७ वाजता त्याचदिवशी घरातील विषारी औषध सेवन करून आत्महत्या केली.
दरम्यान या प्रकरणी विवाहितेचा भाऊ दीपक नारायण सूर्यवंशी रा. इंदौर मध्यप्रदेश यांच्या फिर्यादीवरून बहिण नंदा यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती दिनेश लोहाळेकर, संतोष बदलू लोहाळेकर, कांती बदलू लोहाळेकर, जेठाणी सरस्वती संतोष लोहाळेकर, गंगा कांती लोहाळेकर, आणि नणंद अनिता घनश्याम सुर्यवंशी यांच्यावर शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुरेश सपकाळे करीत आहे.