यावल, प्रतिनिधी । गेल्या पंचवीस ते तीस वर्षापासून यावल तालुक्यात रेशन सार्वजनिक वितरण प्रणालीत मोठा घोळ सुरू आहे.दक्षता समितीचे कामकाज सुद्धा फक्त कागदोपत्री असल्याने अनेक रेशन कार्ड धारकांच्या समस्यांकडे, आणि तक्रारीकडे जिल्हाधिकारी जळगाव जिल्हा,जिल्हा पुरवठा अधिकारी जळगाव,फैजपूर भाग प्रांताधिकारी,तहसीलदार यावल कार्यालयातील पुरवठा अधिकारी यांचे दुर्लक्ष होत आहे.यात सर्वात प्रथम जबाबदार ज्या त्या गावातील दक्षता समिती अध्यक्ष आणि सचिव सदस्य यांचे हित संबंधामुळे दुर्लक्ष होत असल्यामुळे आता काही रेशन कार्ड धारक दक्षता समितीचे सचिव तथा संबंधित तलाठी यांच्या विरोधात लवकरच रीतसर लेखी तक्रारी करणार असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे.
संपूर्ण जळगाव जिल्ह्यात तसेच विशेष करून यावल रावेर तालुक्यात रेशन सार्वजनिक वितरण व्यवस्थेत किती मोठा घोळ सुरू आहे हे सर्वांना चांगल्या प्रकारे ज्ञात आहे गेल्या वर्षापूर्वी रेशन धान्य मालाचा अवैध साठा रावेर येथे सापडल्याने रेशन धान्य मालाची तस्करी करणाऱ्यांविरुद्ध रावेर पो.स्टे.ला गुन्हा दाखल आहे,गेल्या महिन्यापूर्वी यावल पोलिसांनी यावल पोलीस स्टेशन हद्दीतून दुसऱ्या राज्यात जाणारा अवैध रेशन तांदूळ वाहतूक करणारा ट्रक पकडून गुन्हा दाखल केला यामुळे पुन्हा जळगाव जिल्ह्यात खळबळ उडाली होती आणि आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की यावल तालुक्यात रेशन दुकानांची एकूण संख्या 124 आहे यापैकी 50% रेशन दुकानदारांनी आपले रेशन दुकान स्वतः “न” चालविता त्रयस्थ व्यक्तीला मासिक भाड्याने किंवा टक्केवारीने,कमिशनने दुसऱ्यांना रेशन दुकान चालवण्यासाठी दिलेले आहेत.त्यामुळे अनेक रेशन दुकानदार यावल तहसिल पुरवठा विभागात दर महिन्याला चलन भरून दरमहा शासकीय गोडाऊन मधुन रेशन धान्य माल उचल करून आपल्या सोयीनुसार पुढील सर्व प्रक्रिया पार पाडीत असतात.
तालुक्यात अनेक पिवळे BPAL व अंत्योदय BPL , अन्नपूर्णा लाभार्थ्यांना दर महिन्याला वेळेवर निश्चित अशा प्रमाणानुसार रेशन धान्य मिळत नसल्याच्या अनेक तक्रारी आहेत.
तालुक्यात प्रत्येक गावात दर महिन्याला रेशन दुकानातुन रेशन धान्य प्रत्येक रेशन कार्ड धारकास निश्चित केलेल्या प्रमाणानुसार धान्य मिळते आहे किंवा नाही व रेशन दुकानाच्या इतर कामकाजाविषयी नियंत्रण ठेवण्यासाठी किंवा तपासणीसाठी शासनाने दक्षता समित्यांची नियुक्ती केलेली आहे या समितीमध्ये अध्यक्ष म्हणून ग्रामपंचायत सरपंच तर सचिव म्हणून तलाठी आणि सदस्य म्हणून सामाजिक कार्यकर्ते, महिला इत्यादी सदस्य असतात.
ही यंत्रणा कार्यरत असताना सुद्धा तालुक्यात वरील अनेक रेशन कार्ड धारकांना रेशन धान्य निश्चित अशा प्रमाणात किंवा रेशन दुकान वेळेवर उघडत नसल्यामुळे रेशन कार्डधारकांना धान्य मिळत नसल्याने काही रेशन कार्ड धारक दक्षता समितीचे सचिव तलाठी यांच्याविरुद्ध रीतसर लेखी तक्रार करून शिस्तभंग व कर्तव्यात कसूर केल्याच्या तक्रारी करणार आहेत.