मुंबई, वृत्तसंस्था । गेल्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्रातील पोलीस कर्मचाऱ्यांना मोठ्याप्रमाणावर कोरोनाची लागण होत असल्याने निदर्शनास आल्यानंतर राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार पोलीस दलातील ५५ वर्षांवरील वयोगटाच्या कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमचे आदेश देण्यात आले आहेत. राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी गुरुवारी माध्यमांना ही माहिती दिली.
त्यामुळे आता पोलीस दलाला कमी मनुष्यबळ उपलब्ध असेल. मात्र, कोरोनाच्या यापूर्वीच्या दोन लाटांवेळी पोलीस दलाने अशाचप्रकारे काम केल्याचे दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले. मुंबईत गेल्या २४ तासांत ७१ पोलिसांना करोनाची लागण झाली आहे. सक्रीय पोलीस रूग्णांची संख्या २६५ वर जाऊन पोहचली आहे. मार्च २०२० पासून आतापर्यंत १२३ पोलिसांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत बुधवारी टास्क फोर्स आणि आरोग्य खात्याची बैठक पार पडली होती. यावेळी कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे उद्भवणाऱ्या परिस्थितीला सामोरे कसे जायचे, याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. ओमायक्रॉनच्या लाटेत डॉक्टर, रुग्णालयातील अन्य कर्मचारी, आणि पोलीसही अधिक प्रमाणात सापडण्याची शक्यता असून त्यामुळे मोठा ताण येऊ शकतो. हा संभाव्य धोका टाळण्यासाठी आतापासूनच कठोर उपाययोजना करण्यावर बैठकीत चर्चा झाली होती.