मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; आई-वडिलांना भेटायला निघालेल्या जीएसटी उपायुक्तांचा मृत्यू

0
2

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील कामशेत बोगद्यात इनोव्हा कारचा टायर फुटल्यामुळं झालेल्या भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर, दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. मृतामध्ये जीएसटी डेप्युटी कमिशनर अभिजित घवले यांचा समावेश आहे. (GST Deputy Commissioner Killed in Accident at Mumbai Pune Expressway)

हा अपघात मंगळवारी सकाळी आठच्या सुमारास झाला. घवले हे त्यांच्या आई-वडिलांना भेटायला चालले होते. या दुर्घटनेमुळे त्यांची आई-वडिलांची भेट अधुरीच राहिली. अभिजीत घवले (जीएसटी डेप्युटी कमिशनर) यांच्यासह शंकर गोडा यतनाल यांचाही या अपघातात मृत्यू झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अभिजीत घवले यांच्या आई-वडिलांचा लग्नाचा वाढदिवस असल्यामुळे कार्यक्रमासाठी अभिजित घवले हे त्यांची पत्नी, साडू व चालक हे इनोव्हा कारने लातूरला गावी चालले होते. आज सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास मुंबईहून पुण्याकडे जात असताना घवले यांच्या इनोव्हा कारचे कामशेत बोगद्यात समोरील टायर फुटले. भरधाव वेगात असलेली कार पुढे जाणाऱ्या ट्रकवर आदळली. हा अपघात इतका भीषण होता की, इनोव्हा कारच्या समोरच्या भागाचा पूर्णपणे चक्काचूर झाला आहे. या अपघातात कारमधील दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर घवले यांच्या पत्नी व चालक गंभीर जखमी झाले असून, दोघांनाही उपचारासाठी सोमाटणे येथील पवना हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अपघातग्रस्त वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यात आली. या भीषण अपघातामुळे घवले कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here