मुंबई: प्रतिनिधी
मुंबईसह महाराष्ट्रात मोसमी (Mumbai Monsoon) पाऊस सुरू झाला असून पहिल्याच पावसात मुंबई तुंबल्याचं चित्र आहे. मुंबईतील परिस्थितीवरून विरोधकांनी महापालिकेतील सत्ताधारी शिवसेनेवर टीकेची झोड उठवली आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आज संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतला व मुंबईकरांची गैरसोय होणार नाही यासाठी तातडीनं पावलं उचलण्याचे आदेश प्रशासनाला दिले.
#WATCH | Maharashtra: Vehicles wade through water at Gandhi Market in Mumbai, following heavy rainfall. #Monsoon has arrived in Mumbai today. pic.twitter.com/t2njvLfkco
— ANI (@ANI) June 9, 2021
हवामान विभागाने दिलेल्या सूचनेप्रमाणे मुंबई तसेच किनारपट्टीच्या जिल्ह्यांत काल रात्रीपासूनच पावसाला सुरुवात झाली आहे. पुढील तीन दिवस मध्यम ते तीव्र स्वरूपाचा पाऊस होईल, असा अंदाजही व्यक्त करण्यात आला आहे. आजच्या पहिल्याच मोठ्या पावसानं मुंबईची दाणादाण उडाली आहे. अनेक ठिकाणी पाणी तुंबलं आहे. तर, मध्य व हार्बर रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबई महापालिकेच्या नियंत्रण कक्षातून तसंच ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघरच्या जिल्हाधिकाऱ्यांकडून परिस्थितीची माहिती घेतली.
अतिवृष्टीची शक्यता लक्षात घेऊन परवाच मुख्यमंत्र्यांनी आपत्ती व्यवस्थापन विभागाची बैठक घेऊन सर्व यंत्रणांना सज्ज आणि सतर्क राहण्याचे निर्देश दिले होते. त्याप्रमाणे आज सकाळी संबंधित विभागाकडून माहिती घेतली व मुंबई तसेच किनारपट्टीवरील जिल्ह्यातील नागरिकांची गैरसोय होणार नाही यासाठी प्रशासनानं तातडीनं पावलं उचलावीत व आवश्यक तिथं मदतकार्य व्यवस्थित सुरू राहील याची काळजी घ्यावी, अशा सूचना दिल्या. कोविडसह इतर कोणत्याही स्वरूपाच्या रुग्णसेवेत अडथळा निर्माण होणार नाही याचीही दक्षता घेण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी संबंधितांना दिले.
मुंबईत पंम्पिंग स्टेशन्स कार्यरत राहतील व साचलेल्या पाण्याचा लवकरात लवकर निचरा कसा करता येईल याकडं लक्ष द्यावं. तसंच, जोरदार पावसामुळं काही ठिकाणी वाहतूक मंद किंवा थांबलेली असेल, तिथं पोलीस व इतर यंत्रणांनी त्वरीत कार्यवाही करून अडथळे दूर करावेत,’ असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे.