महामंडलेश्‍वर जनार्दन हरीजी महाराज यांचे प्रतिपादन; शिवदर्शन सप्ताहाचा समारोप उत्साहात

0
2

भुसावळ : प्रतिनिधी (राकेश कोल्हे)
छत्रपती शिवरायांची धर्मावर श्रद्धा असल्याने ते वैचारिक श्रीमंत ठरले. मातोश्री जिजाऊ, आईभवानी, रामकृष्ण महादेव आदी देवादीक, तुकोबांसारखे संत यांच्याविषयी विनम्रता दाखवत त्यांनी स्वराज्याची उभारणी केली. या सर्वांवर श्रद्धा ठेवण्याची शिकवण धर्माने शिवरायांना दिली. छत्रपतींची धर्मावर निष्ठा असल्याने स्वराज्याचे अशक्य स्वप्न अतुलनीय पराक्रमामुळे प्रत्यक्षात उतरले. धर्मसंस्काराच्या पायावर छत्रपतींच्या स्वराज्याची उभारणी झाली असल्याचे प्रतिपादन महामंडलेश्‍वर जनार्दन हरीजी महाराज यांनी केले.
भुसावळ येथील छत्रपती शिवाजी महाराज बहुउद्देशीय संस्थेतर्फे शिवजयंतीनिमित्त आयोजित शिवदर्शन सप्ताहाच्या समारोपीय व्याख्यानात ते बोलत होते. शिवदर्शन सप्ताहाची संकल्पना मांडणाऱ्या डॉ. जगदीश पाटील यांनी महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज यांचा परिचय करून दिला. ‘स्वराज्य आणि धर्म` या विषयावर बोलताना जनार्दन हरीजी महाराज म्हणाले की, शिवचरित्र सांगणे व ऐकणे यापेक्षा चरित्रावर काम करून त्याप्रमाणे कृती करणे अपेक्षित आहे. राष्ट्रकार्य करीत असतांना त्याला धर्माचा आधार असावा. धर्माचे संस्कार असल्यास नि:स्वार्थपणे काम करता येते. छत्रपतींच्या स्वभावात धार्मिकता, संतांवरील श्रद्धा असल्याने त्यांचा धर्मरूपी पाया मजबूत होता. त्यांच्या हृदयात संतांबद्दल विनम्रता होती. संपत्ती भेटीवेळी तुकोबांनी आपण दोघेही वैराग्यसंपन्न आहोत असे छत्रपतींना सांगितले. तुकोबांनी धर्मसेवा तर शिवबांनी राष्ट्रसेवा केली. पुरूषार्थरूपी तेजाने छत्रपतींनी सृष्टीला प्रकाशित केले. श्रीकृष्णाने आपल्या चरित्रातून आत्मनिर्भर बनण्याचा उपदेश केला. शिवरायांनी श्रीरामकृष्णाचे चरित्र आईकडून लहानपणीच ऐकल्याने त्यांच्यात देवादिक व धर्माविषयी श्रद्धा निर्माण झाली होती. महादेवावर श्रद्धा असल्याने त्यांनी आपल्या गडकिल्ल्यांवर मंदिरे उभारली. धर्माला मानल्यामुळे अनेक गुण छत्रपतींमध्ये आपल्याला दिसून येतात.
स्त्रीचा सन्मान, न्यायप्रविष्टता या गोष्टी धर्माचे पाईक असल्यामुळे शिवरायांमध्ये निर्माण झाल्या. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य राष्ट्राला समर्पित करून राष्ट्रदेवोभव मानले. धर्म हा माणुसकी निर्माण करण्याचे काम करतो. हे संस्कार व स्वभावाचे सौंदर्य शिवरायांमध्ये होते, असेही महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज यांनी सांगितले. जनार्दन हरीजी महाराज यांच्या सर्वसमावेशक समारोपीय व्याख्यानाने किंबहुना काल्याच्या कीर्तनाने शिवदर्शन सप्ताहाची सांगता झाली. सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन प्रा. डॉ. दिलीपकुमार ललवाणी यांनी केले.
शिवाजी जगण्याचा विषय व्हावा
शिवचरित्र बोलणे व ऐकणे याबरोबरच तो जगण्याचा विषय व्हावा. छत्रपतींची गरिमा आपल्याला राखता आली पाहिजे. आई-वडिलांबद्दल अनास्था असणाऱ्यांना मातृभक्त शिवाजी कळणार नाहीत. समाजाने आपल्याला जे दिले आहे, त्याची उतराई होण्यासाठी समाजातील उणींवांवर काम केले पाहिजे. पूर्वी शास्त्र व शस्त्र शिकवले जाई. छत्रपतींनी या दोघांचा पूर्ण अभ्यास केलेला होता. शास्त्रावर आक्रमणे झाली तर शस्त्रे असावी. फक्त शस्त्र शिकून चालत नाही तर शास्त्राचा सुद्धा अभ्यास करावा लागतो. शास्त्र आणि शस्त्र यांचा अभ्यास असल्यास राष्ट्र सुरक्षित राहते, असेही महामंडलेश्वर जनार्दन महाराज यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here