मलमपट्टी नव्हे तयार होणार नवीन रस्ते, शिवसेनेच्या महापौरांच्या काळात सुरुवात

0
2

जळगाव, प्रतिनिधी । जळगाव शहरवासियांची खऱ्या अर्थाने नवीन नांदी सुरु झाली आहे. शिवसेनेची सत्ता प्रस्थापित झाल्यानंतर महापौर जयश्री महाजन यांच्या काळात रस्त्यावर डांबर ओतला गेला आहे. आजवर रस्त्यांची केवळ मलमपट्टी केली जात होती. अनेकवेळा डागडुजी केलेल्या रस्त्यांची नागरिकांना देखील चीड यायला लागली होती अखेर गेल्या महासभेत विकासकामांचे प्रस्ताव मंजूर झाले आणि आज नवीन रस्ते तयार करण्यास सुरुवात झाली. गुरुवारी महापौर जयश्री महाजन यांनी कामाची पाहणी देखील केली.

जळगाव शहरातील रस्ते अटलांटा कंपनीने केलेल्या कामानंतर तयारच झालेले नव्हते. ठराविक प्रभागातील रस्ते सोडले तर मुख्य मार्ग आणि इतर रस्त्यांची आजवर केवळ डागडुजीच झाली आहे. जळगाव शहरातील रस्त्यांची अगोदरच दुर्दशा होती आणि त्यातच भूमिगत गटार आणि अमृत योजनेच्या कामांनी रस्त्यांची पार वाट लावली. गेल्या तीन वर्षापासून तर जळगावकर नागरिक जणू नरकयातनाच सहन करीत होते.

जळगाव शहरातील प्रमुख रस्ते आणि काही कामांसाठी मंजूर करण्यात आलेल्या ८५ कोटींच्या कामाला गेल्या महासभेत मंजुरी देण्यात आली. शिवसेनेच्या हातात सत्ता आल्यानंतर प्रलंबित विषयांसह रस्त्यांच्या कामाला प्रथम प्राधान्य देण्यात आले. मुख्य रस्त्यांची कामे होणार असल्याची घोषणा तर झाली परंतु प्रत्यक्षात कामाला सुरुवात होणार कि नाही अशी धाकधूक देखील नागरिकांच्या मनात होती. महापौर जयश्री महाजन यांनी संक्रांतीच्या पूर्वसंध्येलाच जळगावकरांना गोड बातमी दिली असून रस्त्यांच्या कामासाठी डांबर येऊन पोहचले असून प्रत्यक्षात कामाला देखील सुरुवात झाली आहे.

शहरातील स्वातंत्र चौक ते नेरी नाका, टॉवर चौक ते ममुराबाद नाका, टॉवर चौक ते स्वातंत्र्य चौक, काव्यरत्नावली चौक ते स्वातंत्र्य चौक, बेंडाळे चौक, पांडे चौक ते सिंधी कॉलनी चौक, दूध फेडरेशन ते निमखेडी रोड अशा रस्त्यांची कामे सर्वप्रथम होणार आहेत. गुरुवारी दुपारी नेरी नाका ते स्वातंत्र्य चौक रस्त्याच्या कामाची महापौर जयश्री महाजन यांनी पाहणी केली. प्रसंगी मनपा आयुक्त सतीश कुलकर्णी यांच्यासह मनपा अधिकारी आणि मक्तेदार प्रतिनिधी देखील उपस्थित होते. कामाचा दर्जा आणि गुणवत्ता योग्य राखण्यासंदर्भात महापौर जयश्री महाजन यांनी सूचना केल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here