मतदारांची उदासीनता लोकशाहीला धोका – केंद्रप्रमुख नरेंद्र सोनवणे

0
3
चोपडा – प्रतिनिधी ( संदिप ओली) 
येथील महिला मंडळ माध्यमिक विद्यालयात २५ जानेवारी – राष्ट्रीय मतदार दिवसानिमित्त विविध मतदार जागृतीपर कार्यक्रम व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. मतदारांमध्ये मतदानाविषयी जागृती निर्माण व्हावी व संविधानाने दिलेल्या हक्काचा जबाबदारीने वापर करण्याची जाणीव निर्माण करण्यासाठी कार्यक्रमातून मार्गदर्शन करण्यात आले.
             याप्रसंगी चहार्डी केंद्राचे केंद्रप्रमुख तथा निवडणूक विषयक कार्यक्रमांचे मार्गदर्शक नरेंद्र सोनवणे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी बोलतांना ते म्हणाले, भारत स्वतंत्र झाल्यानंतर २५ जानेवारी १९५० रोजी भारतीय निवडणूक आयोग या स्वायत्त संस्थेची स्थापना करण्यात आली. त्या माध्यमातून निष्पक्ष वातावरणात निवडणुका घेऊन लोकशाही सुदृढ करण्याचे काम केले जात आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाप्रमाणे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची जबाबदारी ही राज्य निवडणूक आयोगावर असते. नवमतदारांनी जागरूक मतदारासारखे प्रत्येक निवडणुकीत मतदानाचा आपला हक्क बजावला पाहिजे. निवडणुकीतील मतदानाचे कमी असणारे प्रमाण हे लोकशाहीला धोका निर्माण करते. कमी मतदानामुळे अयोग्य उमेदवार आपला प्रतिनिधी म्हणून निवडला जाऊ शकतो. भारत सरकारतर्फे २०११ सालापासून पासून २५ जानेवारी हा दिवस ‘राष्ट्रीय मतदार दिवस’ म्हणून साजरा करण्यात येतो. राष्ट्रीय मतदार दिवसानिमित्त नवमतदारांना ओळखपत्र देऊन त्यांचे स्वागत केले जाते.
         यावेळी विद्यालयातर्फे आयोजित करण्यात आलेल्या निबंध, वक्तृत्व, घोषवाक्य, चित्रकला, समुहगायन स्पर्धांमधील विजेत्या विद्यार्थ्यांना केंद्रप्रमुख नरेंद्र सोनवणे यांच्या हस्ते बक्षिसे व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. कु. जागृती बारी व कु. मोहिनी पाटील यांनी मनोगते व्यक्त केली. विद्यालयातील विद्यार्थिनींनी निवडणूक आणि मतदार जागृती विषयक समूहगीत सादर केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय सोनवणे, प्रास्ताविक सुनील चौधरी व परिचय संजय बारी यांनी तसेच आभार प्रदर्शन सुनील पाटील यांनी केले. यावेळी मंचावर विद्यालयाचे मुख्याध्यापक सुनील चौधरी, पर्यवेक्षक दीपक शुक्ल, ज्येष्ठ शिक्षक सुनील पाटील, संजय बारी, निवडणूक साक्षरता मंच विद्यार्थी प्रमुख मृणाल वैद्य हे उपस्थित होते. कार्यक्रमास शिक्षकांसह इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष तर इतर विद्यार्थी व पालकांची ऑनलाइन उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यालयातील निवडणूक साक्षरता म्हणजे शिक्षक प्रमुख सोनवणे, शिक्षक भावेश लोहार, वनराज महाले, प्रशांत चव्हाण यांच्यासह मदतनीस बाळासाहेब भालेराव, संजय पाटील यांनी सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here