मुंबई : महागाईचा मुद्दा घेऊन केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या भेटीला गेलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांवर पुणे येथे भाजपच्या कार्यकर्त्यांनी हात उगारला. यामुळे राजकीय वातावरण तापले आहे.या घटनेवर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी संताप व्यक्त केला आहे. पुन्हा कोणत्या महिलेवर पुरूषाने हात उचलला तर मी स्वत: त्याचा हात तोडून त्याच्या हातात देईन, अशा शब्दात सुळे यांनी इशारा दिला. यावरून भाजप नेते अतुल भातखळकर यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे.
अतुल भातखळकर यांनी ट्विट करत उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला. कानफाटात मारावीशी वाटली होती या वक्तव्यावरुन केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक करणारे मर्दांचे महाविकास आघाडी सरकार आता हात तोडण्याची भाषा करणाऱ्या खासदार सुप्रियाताई सुळेंवर तशीच कारवाई करणार ना? असा सवाल उपस्थित करत अहो बेस्ट मुख्यमंत्री… जनतेला दिसू तर द्या तुमची मर्दानगी, अशा शब्दात भातखळकर यांनी उद्धव ठाकरेंवर सडकून टीका केली.