भाऊ झाला भावालाच परका; रुग्णाला मिळाला “बेघर केंद्रा”चा आधार

0
3

जळगाव, प्रतिनिधी । ‘आपला भाऊ रुग्णालयात दाखल आहे. येऊन भेटा’ असे निरोप देऊनही सख्या भावाने पाठ फिरवली. तरीही महिनाभर रुग्णाला उपचार सुरु ठेवत त्याला वैद्यकीय पथकाने पूर्ण बरे केले. अखेर, कोणीच नातेवाईक न आल्याने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाने महानगरपालिकेच्या शहरी बेघर निवारा केंद्राशी संपर्क साधला. शनिवारी दि. ८ जानेवारी रोजी अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांच्या उपस्थितीत या ‘बेवारस’ रुग्णास रुग्णालयातून निरोप देण्यात आला.

प्रमोद जोशी (वय ५५, रा. खोटे नगर, जळगाव) असे या रुग्णाचे नाव आहे. त्यांना ४ डिसेंबर रोजी प्रकृती अस्वास्थामुळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे दाखल करण्यात आले होते. कक्ष क्र. ७ येथे महिनाभर उपचार झाल्यावर त्यांना शनिवारी रुग्णालयातून निरोप देण्यात आला. महिन्यातून अनेक वेळा त्यांच्या भावाशी व इतर नातेवाईकांशी संपर्क साधून त्यांना घेऊन जा असा निरोप देण्यात आला. मात्र अखेरपर्यंत कोणीही न आल्याने त्यांना शहरी बेघर निवारा केंद्रात ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार निवारा केंद्राचे तंत्रज्ञ व्यवस्थापक गायत्री पाटील यांचेशी संपर्क साधून त्यांच्या ताब्यात रुग्णाला देण्यात आले.

यावेळी अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजय गायकवाड, उप वैद्यकीय अधीक्षक डॉ. योगिता बावस्कर, डॉ. बाळासाहेब सुरोशे, डॉ. मिलिंद चौधरी, डॉ. विपीन खडसे, समाजसेवा अधिक्षक संदीप बागुल, मनपाच्या तंत्रज्ञ व्यवस्थापक गायत्री पाटील, शहरी बेघर निवारा केंद्राचे व्यवस्थापक मनोज कुलकर्णी, काळजीवाहक राजेंद्र मराठे, काळजी वाहक दिलीप चौधरी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here