भविष्यात शालेय शिक्षणात ऑनलाइन शिक्षण असणारच – जिल्हाधिकारी (व्हिडिओ)

0
9
भविष्यात शालेय शिक्षणात ऑनलाइन शिक्षण असणारच - जिल्हाधिकारी (व्हिडिओ)

जळगाव, प्रतिनिधी । “खाजगी ऍप्समध्ये चांगलं प्रेझेंटेशन असू शकतं, पण आपल्या जिल्हा परिषदेच्या शिक्षकांकडे असलेलं ज्ञान बाहेर क्वचित असेल, ते ज्ञान व्ही – स्कूल ने एका ठिकाणी आणलं आहे. या प्रकल्पाच्या निमित्ताने जिल्हाभरातील शिक्षक एकमेकांकडून शिकत आहेत, पिअर लर्निंगच्या माध्यमातून जिल्हाभरातील शिक्षक आपापल्या विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देतील. यातून तयार होणारे धडे हे विद्यार्थ्यांना अभ्यासात मदत करतीलच, पण या प्रक्रियेत आपल्या जिल्ह्यातील शिक्षकांचे जे प्रशिक्षण झाले आहे, त्याचा फायदा दूरगामी असेल.,”असे उद्गार जळगाव जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी व्यक्त केले.

जळगाव जिल्हा परिषद व वॉवेल्स ऑफ द पीपल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमातून जिल्हा परिषदेच्या नियोजन समिती हॉलमध्ये व्ही – स्कूल ऍप प्रकल्पात कार्य केलेल्या सर्वोत्कृष्ट शिक्षकांच्या सत्काराचा कार्यक्रम पार पडला. त्यात ते बोलत होते.

या कार्यक्रमाला जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी पंकज आशिया, इकराचे एज्युकेशन सोसायटीचे प्रेसिडंट करीम सालार, ‘वोपा’चे संस्थापक संचालक प्रफुल्ल शशिकांत, संचालिका ऋतुजा सीमा महेंद्र, शिक्षणाधिकारी विकास पाटील(प्रा), शिक्षणाधिकारी कल्पना चौहान(मा), शिक्षण विस्तार अधिकारी खालील शेख उपस्थित होते.

महाराष्ट्राच्या शिक्षणक्षेत्राला सुपरिचित असलेले माजी शिक्षण सचिव नंदकुमार सर यांनीही आपले मनोगत ऑनलाइन पद्धतीने उपस्थित राहून व्यक्त केले. त्यांनी ‘वोपा’ टीमचे व जळगाव व्ही-स्कूल या प्रकल्पाचे कौतुक केले व त्याचा विद्यार्थी शिक्षकांना फायदा होईल असे नमूद केले.

गेल्या 5 महिन्यांपासून जळगावमध्ये व्ही – स्कूल या प्रकल्पअंतर्गत मराठी – सेमी इंग्रजी व उर्दू माध्यमाच्या 800 पेक्षा जास्त शिक्षकांनी 1250हून अधिक ऑनलाइन धडे व 3000 पेक्षा अधिक व्हिडीओ तयार केले आहेत. त्यांच्या या कार्याचा सत्कार करण्यासाठी हा कार्यक्रम शिक्षण विभाग व वोपाने आयोजित केला होता.
या कार्यक्रमात शिक्षकांनी आपले मनोगत व्यक्त केले व त्यांना ‘वोपा’ टीमने दिलेल्या प्रशिक्षणाचा आपल्या इतर कामांमध्ये कसा फायदा होईल ते सांगितले.

वोपाचे संचालक प्रफुल्ल शशिकांत यांनी व्ही – स्कूल सुरू करण्यामागची संकल्पना उलगडून सांगितली, जळगावमधून जसे मराठी, सेमी इंग्रजी व उर्दू माध्यमाचे शैक्षणिक साहित्य तयार केले जात आहे, तसेच शिष्यवृत्ती, एनएमएमएस परीक्षा, प्रज्ञाशोध परिक्षेचा मोफत अभ्यासक्रम अहमदनगर जिल्ह्यातून तयार केला जात आहे व व्ही – स्कूल हे ऍप पूर्ण मोफत व जाहिरातीरहित असल्याने सर्व विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणाची समान संधी मिळते असेही त्यांनी सांगितले. व्ही – स्कूल प्रणाली वापरून कुठल्याही भाषा व माध्यमाचे शैक्षणिक साहित्य तयार केले जाऊ शकते त्यामुळे महाराष्ट्राप्रमाणेच कुठल्याही राज्यात हे वापरले जाऊ शकते.

जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी पंकज आशिया यांनीही शिक्षकांना मार्गदर्शन केले. त्यावेळी ते म्हणाले कोरोना काळात शिक्षणाची अवस्था बिकट झाली होती, शिक्षण क्षेत्राचे खूप नुकसान झाले. वोपाच्या व्ही – स्कूलमुळे त्यावेळीही अनेक विद्यार्थ्यांना फायदा झाला व आत्ताही होत आहे.

या निमित्ताने उर्दू माध्यमाचे शैक्षणिक साहित्य पहिल्यांदाच ऑनलाइन माध्यमातून उपलब्ध करण्यात आले आहे. संस्कृत विषयचाही अभ्यासक्रम प्रथमच ऑनलाइन उपलब्ध होत आहे. महाराष्ट्रातील सुमारे 6 लाख विद्यार्थ्यांनी हे ऍप डाऊनलोड केले असून ते जळगावच्या शिक्षकांनी तयार केलेला अभ्यासक्रम वापरत आहेत.

व्हीस्कुल प्रकल्पातील सहभागी शिक्षक ज्योती सनेर, भारती अवचारे, हिदायत खाटीक, चंद्रकांत देसले, अल्ताफ अली हसन अली, आर्शिया शेख, व शिवव्याख्याते रामेश्वर भदाणे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. ‘वोपा’च्या गेल्या वर्षीच्या कामकाजाच्या अहवालाचे प्रकाशन यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. लॉकडाऊन नंतर सुरू होणाऱ्या शाळेसाठी विद्यार्थ्यांना प्रेरणा म्हणून जिल्ह्यातील विश्वास पावरा या शिक्षकांनी 4 भाषांमध्ये विद्यार्थ्यांसाठी बनवलेल्या व्हिडीओ गाण्याचे अनावरण या निमित्ताने करण्यात आले.

या कार्यक्रमाला जिल्ह्यातील उल्लेखनीय कामगिरी केलेले मराठी, सेमी इंग्रजी व उर्दू माध्यमाचे शिक्षक, सर्व तालुक्याचे गटशिक्षण अधिकारी उपस्थित होते. सर्व शिक्षक, गटशिक्षण अधिकारी, प्रकल्प समन्वयक खलील शेख यांचा जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी व करीम सालार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here