धरणगाव : प्रतिनिधी
शहरतील एका परिसरात आठ आणि पाच वर्षाच्या दोन बालिकांसोबत एका ६२ वर्षाच्या वृद्धाने अश्लील चाळे केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी रात्री उशिरा धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयित चंदुलाल शिवराम मराठे (वय – ६२) यांच्याविरुद्ध पोक्सा कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान या धक्कादायक घटनेने शहर प्रचंड खळबळ उडाली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, धरणगाव येथील मराठी गल्ली परिसरात चंदुलाल शिवराम मराठे (वय-६२) यांची पीठाची गिरणी आहे. परिसरात राहणारी एक महिला दिनांक २० फेब्रुवारी रोजी दुपारी तीन वाजता आपल्या आठ आणि सहा वर्षाच्या बालिकेंसह दळण दळण्यासाठी पिठाच्या गिरणीवर आल्या होत्या . दोघी चिमुकल्या मुली अंगणातच खेळत होत्या. दळण दळून त्यांची आई घरी निघून गेली. उशीर झाला तरी मुली घरी न आल्यामुळे त्यांची आई त्यांना घेण्यासाठी परत आली. त्यावेळी चंदुलाल मराठे याने दोन्ही मुलींना आक्षेपार्ह अवस्थेत आपल्या मांडीवर घेतल्याचे आईच्या लक्षात आले. तिने संताप व्यक्त करून दोन्ही मुलींना घरी आणले. गरीब कुटुंबातील आई हा प्रकार पाहून हादरून गेली होती. दरम्यान, सहा वर्षाच्या बालिकेने चक्कीवाल्या बाबाने आपल्यालाही मांडीवर बसवले असे सांगताच आई हादरली. कामावर गेलेला पति घरी परतताच तिने सर्व हकीकत पतिला सांगितली.
पतीसह दोघी मुलींना घेऊन या महिलेने सायंकाळी पोलिस स्टेशन गाठले. याप्रकरणी आईच्या फिर्यादीवरून उशिरा गुन्हा दाखल झाला. दरम्यान, या सहा वर्ष वयाच्या पीडित मुलीला वैद्यकीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालय नेले असता तिच्यावर अत्याचार झाल्याचा प्राथमिक अहवाल देण्यात आला. पुढील तपासणीसाठी या बालिकेला तात्काळ जळगाव जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. पीडित मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून शिवराम मराठे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. दरम्यान चंदुलाल मराठेचा मुलगा भूषण मराठे याने पोलीस स्टेशन मध्येच पीडितेच्या आईला धमकावण्याचा प्रयत्न केल्यामुळे त्यालाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या घटनेची चर्चा वाऱ्यासारखी पसरली आणि रात्री संतप्त नागरिकांनी पोलीस स्टेशन आवारात गर्दी केली. या संतापजनक घटनेमुळे प्रचंड खळबळ उडाली आहे.