बालगंधर्व महोत्सवास रसिकांचा प्रतिसाद ; शिवतांडव नृत्य ठरले आकर्षण

0
3

जळगाव : प्रतिनिधी I बालगंधर्व संगीत महोत्सवाचा प्रारंभ गुरुवारी भरतनाट्यम आणि कथ्थक नृत्याच्या जुगलबंदीसह संतूर वादनाने झाला. घुंगरांची झनकार आणि तबल्याच्या तालावर कलावंतांचे पदलालित्य, अदांची जुगलबंदी रंगली होती. देह आणि सूर मिळले अन्‌‍ सायंकाळ जणू नाचू लागली. टाळ्यांच्या कडकडाटाने नाट्यगृह गुंजले. भरतनाट्यम व कथ्थक नृत्याच्या संगमाने मानसी मोदी व मानसी करानी या कलावंतांच्या नृत्य सौंदर्याने प्रेक्षकांचे मन मोहून गेले. पंडित संदीप चॅटर्जी यांच्या संतूर वादनाने संध्याकाळ सूरमयी झाली. जळगावच्या कलावंतांनी शिवतांडव नृत्य सादर केले.

महोत्सवाचे उद्घाटन महापौर जयश्री महाजन, आयुक्त सतीश कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी डॉ. विवेकानंद कुलकर्णी, चांदोरकर प्रतिष्ठानचे अध्यक्ष दीपक चांदोरकर, दीपिका चांदोरकर, अरविंद देशपांडे उपस्थित होते. पहिल्या सत्रात मैहर व पटियाला घराण्याचे प्रतिनिधित्व करणारे पंडित संदीप चॅटर्जी यांच्या संतूर वादनाने सूरमयी सुरुवात झाली. त्यांनी संतूरवर राग गिरवानी, आलाप, जोडझाला, मध्यलय रुपक तालाचे सादरीकरण केले. त्यांना तबल्याची साथसंगत संदीप घोष यांनी केली. मानसी करानी व मानसी मोदी यांनी पुष्पांजली सादर केली. कट्यार काळजात घुसली या चित्रपटातील देश रागावर आधारित मन मंदिरा या गीतावर नृत्याविष्कार सादर केला. करानी यांनी कथ्थक संगम नृत्याविष्कार पेश केला. श्रीकृष्णावर रागावलेल्या राधेचे भाव, प्रेम, आक्रंदनासह कारुण्यभाव नृत्य सादरीकरणातून प्रकट झाले. बरसे बदरिया सावन की… या मीराबाई यांच्या भजनावर कथ्थक नृत्याच्या जुगलबंदीने हर्षोल्हासित, उत्सवी भाव प्रकटले. पहिल्या दिवसाचा समारोप रॉक फ्यूजन संगमवर जुगलबंदीने झाला. महोत्सवात शुक्रवारी ‘मर्मबंधातली ठेव` हा नाट्य संगीताचा विशेष कार्यक्रम श्रीरंग भावे, धनंजय म्हसकर, वेदश्री ओक सादर करतील.

धनंजय म्हसकर : धनंजयचे शास्त्रीय गायनाचे शिक्षण पहिल्या गुरू मोनिका पोतदार यांच्याकडे झाले आहे. सध्या पं. संजीव अभ्यंकर यांच्याकडे मेवाती घराण्याचे शिक्षण चालू आहे.
वेदश्री ओक : एसएनडीटी महिला विद्यापीठांमधून वेदश्रीने संगीतात एमए केले आहेत. ठाण्याच्या सुलोचना देवी सिंघानिया स्कूल येथे त्या संगीत शिक्षक व संगीत विभागाच्या प्रमुख आहेत.

आजच्या ‘मर्मबंधातली ठेव` च्या कलावंतांचा परिचय
श्रीरंग भावे : प्रख्यात गायिका सरिता भावे, प्रख्यात शास्त्रीय व्हायोलिन वादक व संस्कृतचे स्कॉलर पं. राजेंद्र भावे यांचे श्रीरंग भावे चिरंजीव आहे. त्यांनी पं. राम देशपांडे, सरिता भावे यांच्याकडे घेतले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here