पिंपरीः नशेचे इंजेक्शन देऊन अल्पवयीन तरुणीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गेल्या आठ महिन्यांपासून तरुणीला खोलीमध्ये डांबून ठेवून अत्याचार सुरू होता. दरम्यान, पीडित तरुणीने आरोपीच्या तावडीतून सुटका झाल्यानंतर हिंजवडी पोलिस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दिली आहे.
हिंजवडी पोलिसांनी याप्रकरणी समीर भालेराव याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी समीर भालेराव आणि फिर्यादी तरुणी एकमेकांना ओळखतात. समीर रॅपर गायक असून, त्याने अनेक मुलींना मॉडेलिंगचे काम मिळवून दिले होते. फिर्यादी ब्यूटीशियनचे काम करत असून, त्यांनाही मॉडेलिंगची आवड असल्याने दोघांची ओळख झाली. समीरने पीडितेसमोर आपल्या प्रेमाची कबुली दिली. मात्र, तरुणीने त्याला नकार दिला. त्यामुळे समीर दुखावला गेला होता.
त्याने गेल्या वर्षी २५ सप्टेंबरला तरुणीच्या घरी जाऊन आपल्यासमवेत चलण्याविषयी बजावले. तिने नकार देताच तिच्या लहान भावाला घराबाहेर घेऊन गेला. त्याला मारण्याची धमकीही दिली. त्यानंतर आरोपीने पीडित तरुणीवर अत्याचार करण्यास सुरुवात केली. झोपेत असताना समीर नशेचे इंजेक्शन देत असे, असेही तरुणीने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. हा प्रकार २५ सप्टेंबर २०२० पासून १७ जुलै २०२१पर्यंत सुरू होता. एकेदिवशी समीर फोनवर बोलत असताना तरुणीने पळून जाऊन वडिलांचे घर गाठले.