जळगाव ः प्रतिनिधी
देशात कोरोनाची तिसरी लाट दुसऱ्या लाटेप्रमाणे शहरांमधून सुरु झाली असून खबरदारीची उपाययोजना म्हणून राज्यशासनाने काही मार्गदर्शक तत्वे जारी करत निर्बंधाबाबतच्या सुचना प्रशासनाला केल्या असल्यावरही तालुक्यातील नशिराबाद येथे 15 ते 18 वयोगटातील लसीकरण मोहिमेच्या उद्घाटनप्रसंगी मार्गदर्शक तत्वांना तिलाजली देत गरज नसलेल्या कर्मचाऱ्यांना सक्तीने उपस्थित राहण्याच्या सुचना करीत प्रशासनाच्या कोरोनासंदर्भात निर्बंधाचा फज्जा उडवित कोरोनालाच आमंत्रण दिल्याचे चित्र पहावयाला मिळाले. याप्रकरणी जि.प. मुख्याधिकारी व जिल्हाधिकारी यांनी चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी सुज्ञ नागरिकांमधून होत आहे.
देशासह राज्यात डेल्डा व ओमायक्रॉनमुळे कोरोना संसर्गात सातत्याने वाढ होत आहे. सदरचे लक्षणे हे तिसऱ्या लाटेचे असल्याचे तज्ञांना वाटत असल्यामुळे या कोरोना लाटाचा प्रार्दूभाव थोपवण्यासाठी राज्य प्रशासनाने विशेष निर्बंध जारी केले आहे. त्यात रात्रीच्या संचार बंदीचाही समावेश आहे. यापार्श्वभूमीवर जिल्ह्यातही शासनाकडून सुचनासह मार्गदर्शकतत्वे जारी केले आहे. या मार्गदर्शक तत्वांना अनुसरून जिल्ह्यात 15 ते 18 वर्ष वयोगटातील मुलांना कोरोना लसीकरण करतांना पालन करणे आवश्यक आहे. मात्र तालुक्यातील नशिराबाद येथील सार्वजनिक वाचनालयात आयोजित करण्यात आलेल्या लसीकरण मोहिमेच्या उद्घाटन प्रसंगी गर्दी टाळायचे सोडून संबंधित तालुका वैद्यकिय अधिकारी यांनी गटविकास अधिकारी कार्यालयातील आरोग्य कर्मचारी व परिसरातील सर्वच आशा कर्मचाऱ्यांना सक्तीने उपस्थित राहण्याचे तोंडी आदेश दिले होते. त्यामुळे लसीकरण केंद्रावर मोठ्या प्रमाणात गर्दी जमा झाली. प्रसंगी सोशल डिस्टस्निंगचा मोठा फज्जा उडाल्याचे चित्र पहावयास मिळाले. या कार्यक्रमासआशा कर्मचाऱ्यांची काहीही गरज नसतांना त्यांना उपस्थित राहण्याचे तोंडी आदेश देण्याचे काय काय होते? गर्दी जमवून संबंधित अधिकारी काय सिध्द करणार होते. या प्रसंगामुळे एक प्रकारे संबंधितांनी कोरोना पसरविण्यासाठी हातभारच लावल्याचे सुज्ञ नागरिकांमधून चर्चीले जात आहे. याप्रकरणी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चौकशी करीत संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी सुज्ञ नागरिकांमधून होत आहे.