तरुणावर किरकोळ कारणावरून बसस्थानकाजवळ चाकूहल्ला

0
3

जळगाव प्रतिनिधी । चिंचोली येथील २१ वर्षीय तरुणावर किरकोळ कारणावरून बसस्थानकाजवळ चाकूहल्ला झाल्याची घटना २ जानेवारी रोजी रात्रीच्या सुमारास घडली. याप्रकरणी आज सकाळी एमआयडीसी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगाव तालुक्यातील चिंचोली येथील तरूणावर किरकोळ वादावरून बसस्थानकाजवळ चाकूहल्ला केल्याचा प्रकार रविवारी २ जानेवारी रोजी रात्री घडला होता. याप्रकरणी सोमवारी ३ जानेवारी रोजी सकाळी एमआयडीसी पोलीस ठाण्यात परस्पविरोधात दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहे. निलेश दिलीप गडकर (वय-२१) रा. चिंचोली ता.जि. जळगाव हा आपल्या आईवडीलांसह वास्तव्याला आहे. तो नूतन मराठा महाविद्यालयात पहिल्या वर्षाला शिक्षण घेत आहे. रविवारी २ जानेवारी रोजी रात्री ८.३० वाजेच्या सुमारास निलेश हा घरी असताना त्याच्या गावातील गौरव सुनील शेळके याने फोन करून बोलून घेतले. त्यानुसार निलेश गावातील बसस्थानकाजवळ भेटायला गेला.

त्यावेळी गौरव सोबत दिनेश शेळके, गोपाल ज्ञानेश्वर शेळके यांच्यासह चार ते पाच जण हातात बॅट, हॉकी स्टिक आणि चाकू घेऊन उभे होते. दरम्यान यातील गौरव म्हणाला कि, तू ३१ डिसेंबरच्या पार्टीला जास्त बोलत होता, असे म्हणत गौरवने त्याच्या हातातील चाकूने निलेशच्या डोक्यावर वार करून गंभीर दुखापत केली. त्यानंतर इतरांनी बॅट व हॉकीस्टीकने बेदम मारहाण केली. जखमी अवस्थेत जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. सोमवारी ३ जानेवारी रोजी निलेश गडकर यांच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी गौरव सुनील शेळके, दिनेश शेळके, गोपाल ज्ञानेश्वर शेळके सर्व रा. चिंचोली ता. जळगाव यांच्यासह ४ ते ५ जणांविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल गफुर तडवी करीत आहे.

तसेच गौरव सुनिल शेळके (वय-२०) रा. चिंचोली ता.जि. जळगाव यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, निलेश दिलीप गडकर याने ३१ डिसेंबर रोजी शिवीगाळ केली होती. याचा जाब विचरण्यासाठी गौरव सुनिल हा २ जानेवारी रोजी गावातील बसस्थानकाजवळ आला होता. त्यावेळी जाब विचारला असता निलेश गडकर याने लोखंडी रॉडने डोक्यात घाव घातले. तर त्याचा भाऊ सागर दिलीप गडकर आणि विनोद गडकर यांनी लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. तिघांनी दगड गौरव शेळकेच्या अंगावर मारले.

यात गौरव हा जखमी झाला होता. त्याला जळगावातील खासगी रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. याप्रकरणी सोमवारी ३ जानेवारी रोजी गौरव शेळके यांच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी निलेश दिलीप गडकर, सागर दिलीप गडकर आणि विनोद गडकर तिघे रा. चिंचोली ता.जि.जळगाव यांच्या विरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक सचिन पाटील करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here