तब्बल सहा महिन्यानंतर अभिषेकला मिळाली आई

0
3

मलकापुर : प्रतिनिधी
कोरोनाच्या लॉकडाऊनच्या परिस्थितीत एक अंदाजे ४५ वयोगटातील महिला एकटीच फिरत असल्याचे निदर्शनास आल्याने पत्रकार गजानन ठोसर यांनी प्रसंगावधान राखत सदर महिलेस विश्‍वासात घेवून पोलीसांशी संपर्क साधत महिलेजवळ असलेल्या कागदपत्रांच्या आधारे मलकापूर पोलीसांनी महिलेच्या नातेवाईकांचा शोध घेवून मुलाचा पत्ता लावत माय-लेकांची भेट घडवून आणली. तब्बल सहा महिन्याच्या विरहानंतर पुत्राने आईला भेटल्यानंतर मुलाच्या चेहर्‍यावर आनंदाश्रू तराळले. दरम्यान, माय-लेकांच्या भेटीसाठी पोलीस व पत्रकारांनी केलेल्या प्रयत्नांबद्दल पंचक्रोशीत कौतुक होत आहे.
शहरात सद्यस्थितीत कडक लॉकडाऊन सुरू असुन संचारबंदी सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे अश्यातच सायंकाळी सहा वाजेदरम्यान पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष गजानन ठोसर शहर पो.स्टे कडे जात असतांना तहसील चौकात अंदाजे पंचेचाळीस वर्षीय मनोरुग्ण महिला हातात दोन बॅगा घेऊन भटकतांना दिसल्याने त्यांनी सहकारी पत्रकार गौरव खरे, समाधान सुरवाडे, विजय वर्मा आदींना सोबत घेत तहसील चौकातील ड्युटी वर तैनात असलेल्या सुरेश रोकडे यांना सांगितले, शहर पोलीस निरीक्षक प्रल्हाद काटकर यांनाही भ्रमणध्वनीद्वारे पत्रकार गजानन ठोसर यांनी माहिती दिली. पो.नि. काटकर यांनी तात्काळ घटनास्थळ गाठत परीस्थितीचा आढावा घेतला, गजानन ठोसर यांनी अनाथांचे कैवारी, सेवा संकल्प प्रतिष्ठान पळसखेड ता. चिखली येथील डॉ. नंदकिशोर पालवे याचेशी संपर्क साधला असता डॉ.पालवे यांनी मलकापुर येथे येऊन शहर पोलीस निरीक्षक प्रल्हाद काटकर, ज्येष्ठ पत्रकार रमेश उमाळकर, गजानन ठोसर सह पत्रकार व पोलीसांच्या मदतीने त्या महिलेस पळसखेड येथे सेवा संकल्प प्रतिष्ठानात आणले. त्या महिलेच्या आधारकार्ड वरील पत्यावरुन ब्रम्हपुरी जि.चंद्रपुर पोलीस स्टेशनशी ठोसर यांनी संपर्क साधत ठाणे अंमलदार रामटेके यांना सदर महीलेची मिसिंग तक्रार वैगेरे दाखल आहे का? याबाबत विचारणा केली मात्र रामटेके यांनी सदर महीलेबाबत मिसिंग दाखल नसून सहकार्य दाखवित त्या महीलेच्या आधारकार्ड वरील पत्त्यावर घरी जाऊन तिचा भाऊ सुरेश वंजारी यांचेशी भ्रमणध्वनीवर बोलणे करुन दिले, नंतर सुरेश वंजारी यांनी ही माहिती भोपाळ येथील मोठे बंधु नरेश वंजारी, त्या महीलेचा वापी (गुजरात) येथील मुलगा अभिषेक उर्फ दादु यांस माहिती दिल्याने दादु याने व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संपर्क साधून आई सहा महिन्यापासून मी तुझी वाट पाहत आहे व तु भेटावी म्हणुन दररोज देवाला अगरबत्ती सुद्धा लावीत आहे, आई तु आता मला मिळाली
असून तुला घेण्यासाठी मी मलकापूर येथे येत असल्याचे व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे त्यांनी सांगितले, मुलाशी भ्रमणध्वनीद्वारे झालेल्या संभाषणाचे तेज तिच्या चेहर्‍यावर उमटले आणि उपस्थितांना सुद्धा बरे वाटले आईला घेण्यासाठी अभिषेक उर्फ दादू हा त्याच्या मामा नरेश वंजारी सह मलकापूर शहर पोलीस स्टेशन येथे दाखल झाला.
मलकापूर येथून पत्रकार गजानन ठोसर, विरसिंहदादा राजपूत, गौरव खरे, समाधान सुरवाडे, राजेश इंगळे आदींनी वंजारी परिवार सोबत पळसखेड (चिखली)येथील सेवा संकल्प प्रतिष्ठान गाठले दादूला त्याची आई मिळवून दिली यावेळी दादूने आईला मिठी मारली तब्बल सहा महिन्यानंतर मायलेकांची अनपेक्षित भेट झाल्याने दोघांचेही अश्रु अनावर झाले होते, कायदेशीर सोपस्कार पार पाडून आईला अभिषेकच्या ताब्यात देण्यात आले, अभिषेकने मलकापूर येथील पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, शहर पो.नि. प्रल्हाद काटकर, पोलीस कर्मचारी वृंद, तसेच सेवा संकल्प संस्थांचे डॉ. नंदकिशोर पालवे यांचे आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here