डॉ.वीरेंद्र, डॉ.प्रणीता झांबरे यांच्या प्रयत्नांमुळे वाचले न्हावी येथील महिलेचे प्राण

0
8

 

भुसावळ : प्रतिनिधी

प्रसुती वेदना वाढल्याच्या बिकट स्थितीत कोरोना पॉझिटिव्ह २१ वर्षीय गरोदर महिला डॉ. वीरेंद्र व प्रणीता झांबरे यांच्या प्रतिभा कोविड हॉस्पिटलमध्ये दाखल झाली. या महिलेवर तातडीने सिझेरियन शस्त्रक्रिया करण्यात आली. यानंतर कोणताही धोका नको म्हणून नवजात बाळाला १० दिवस विलगीकरणात ठेवण्यात आले. आईला कोरोना असला तरी बाळ मात्र सुरक्षित राहिले. दरम्यान, दहा दिवसांच्या उपचारानंतर प्रकृती ठणठणीत झालेल्या महिलेला डिस्चार्ज देण्यात आला.

कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा शब्दही कानावर पडता की भल्याभल्यांची भंबेरी उडते. त्यातच गरोदर महिला कोरेाना पॉझिटिव्ह आढळल्यास अनेकवेळा डॉक्टरही उपचारासाठी नकार देतात. असाच एक प्रसंग न्हावी (ता.यावल) येथील सुचिता राहूल चौधरी (वय २१) यांच्यासोबत घडला. सुचिता यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. नेमके याच काळात त्यांना प्रसूती वेदना सुरू झाल्या. चार डॉक्टरांकडे जावूनही त्या कोरोना बाधित असल्याने उपचारास नकार मिळाला. दुसरीकडे प्रसूती वेदना वाढतच असल्याने त्या ८ मे रोजी डॉ.विरेंद्र झांबरे व डॉ.प्रणीता झांबरे यांच्या प्रतिभा कोविड हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्या. तेथे तपासणी केल्यानंतर बाळाने पोटात शौचास केल्यामुळे तत्काळ सिझेरियन गरजेचे

होते.

रुग्णाच्या नातेवाइकांना पुढील धोक्याची पूर्वकल्पना देत डॉ. झांबरे दाम्पत्याने हे आव्हान स्वीकारुन सिझेरियन केले. सुचिताने गोंडस मुलास जन्म दिला. मात्र, आईला असलेल्या कोरोनाची बाळाला लागण होऊ नये म्हणून डॉ. झांबरे दाम्पत्याने नवजात बाळास १० दिवस विलगीकरणात ठेवण्याचा निर्णय घेतला. बाळासोबतच कोणाचाही संपर्क येवू दिला नाही. त्यास केवळ गाईचे दूध हाच आहार दिला. वेळीच घेतलेल्या काळजीमुळे बाळाचा कोरोनापासून बचाव झाला.

घाबरू नका, तातडीने चाचणी करा

परिवारात कोणीही कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्यास गरोदर महिलेची प्राधान्याने कोरोना चाचणी करुन घ्यावी. यामुळे बाळंतपणात इतर गुंतागुंत वाढणार नाहीत. कोणत्याही कठीण प्रसंगाला घाबरुन न जाता उपचार करुन बरे होण्यावर दृढ विश्वास ठेवावा. डॉ.प्रणीता झांबरे, स्त्रीरोग तज्ज्ञ , भुसावळ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here