जळगाव ः प्रतिनिधी
भारतरत्न डॉ. अब्दुल कलाम पुस्तक भिशीतर्फे जागतिक मातृदिनाच्या निमित्ताने कर्तृत्ववान व आदर्श मातांचा त्यांच्या घरी जाऊन गौरव करण्यात आला. उपक्रमांची संकल्पना ही नवा विचार देणारी असल्याची भावना मान्यवरांनी या कार्यक्रमात व्यक्त केली. रविवार व सोमवार असे दोन दिवस हा उपक्रम राबवण्यात आला.
मातृसन्मान सोहळ्याची प्रेरणा पुस्तक भिशी ग्रुपला डाएटचे निवृत्त प्राचार्य नीळकंठ गायकवाड, प्राथमिक विभागाचे निवृत्त शिक्षण उपसंचालक शशिकांत हिंगोणेकर, निवृत्त माध्यमिक उपशिक्षणाधिकारी सिद्धार्थ नेतकर यांच्याकडून मिळाली. कार्यक्रमास दीपस्तंभ स्पर्धा परीक्षा केंद्राचे संचालक यजुर्वेंद्र महाजन, संयोजक तथा भारतरत्न डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम पुस्तक भिशीचे संस्थापक जिल्हाप्रमुख विजय लुल्हे, जगदीश महाजन, मनोहर खोंडे, देवकाई प्रतिष्ठानचे अध्यक्ष चित्रकार सुनील दाभाडे, राजकुमार गवळी, मनोबल दिव्यांग केंद्राचे व्यवस्थापक आर. डी. पाटील, वसतिगृह व्यवस्थापिका विद्या भालेराव, नृत्यांगना मानसी पाटील, ॲडमिन सम्राट माळवदकर, संगणक प्रशिक्षक श्याम मिश्रा, सेवक पंकज गिरासे, ऋषी सोळुंके, ऋतिका कोळी, रिद्धी सोळुंके, पुंडलिक किनगे, सिंधू सुतार, सुवर्णा लुल्हे, समीक्षा लुल्हे, सुरेखा बडगुजर, सुदाम बडगुजर व इतर मान्यवर उपस्थित होते.
उपक्रमाकडे चळवळ म्हणून बघा
आदर्श मातांचा सत्कार समाजाला दीपस्तंभासमान असतो. हा उपक्रम समाजाने चळवळ म्हणून उत्स्फूर्तपणे राबवावा, असे प्रा .दिलीप चौधरी यांनी नमूद केले. कौटुंबिक सौख्याचा पाया व सेवा समर्पणाचा कळस कुटुंब संस्थेसाठी काम करणाऱ्या व चंदनाप्रती झिजणाऱ्या मातांचा सन्मान सोहळा औषधोपचारांपेक्षा महत्त्वाचा आहे. निश्चितच त्यांना दीर्घायुष्य व मानसिक आरोग्य देणारा ठरेल, असे दीप्ती किनगे यांनी नमूद केले.
पुस्तक भिशीतर्फे मातांचा सन्मान
सुमती अनिल महाजन यांचा सत्कार निवृत्त प्राध्यापक दिलीप चौधरी (उपयोजित यंत्रशास्त्र विभाग प्रमुख, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, अमरावती), जनता बँकेच्या संचालिका सावित्री रवींद्र सोळुंके (जनता बँक संचालिका जळगाव) यांचा सत्कार श्रद्धा ऋषी सोळुंके, दीप्ती पुंडलिक किनगेंचा सत्कार अलका चौधरी व योगशिक्षिका वर्षा किनगे यांनी केला. सिंधू सुपडू सुतार यांचा सत्कार शिवाजीनगरातील सावरकर मित्रमेळाचे संस्थापक संजय भावसार, इंदूबाई शांताराम बडगुजर यांचा सत्कार विजय लुल्हे, सरला मनोहर खोंडे यांचा सत्कार वर्षा जगदीश बोरसे, तुषार खोंडे, राधा खोंडे यांनी केला.