जळगाव : प्रतिनिधी
ममुराबाद रोडवरील मनुदेवी मंदिरानजीक भरधाव जाणार्या टाटा सुमोने दुचाकीस समोरुन जबर धडक दिल्याने दुचाकीवरील तरुण गंभीर जखमी होत जागीच ठार झाल्याची घटना आज दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास घडली. यात दुचाकीवरील दुसरा तरुण जखमी झाला आहे.
याबाबत माहिती अशी की, यावल तालुक्यातील थोरगव्हाण येथील अमोल संभाजी पाटील (वय २२) व गोलू रमेश पाटील हे दोन्ही तरुण दुचाकी बजाज प्लॅटीना (एम.एच.१९-डीएम.७६३६) ने जळगावकडे येत असताना ममुराबाद जळगावदरम्यान मनुदेवी मंदिराजवळ जळगावकडून ममुराबादकडे जाणार्या टाटा सुमो (एम.एच.१९-एएक्स.५६५१) ने दुचाकीस जबर धडक दिली. या धडकेत दुचाकीवरील अमोल संभाजी पाटील हा गंभीर जखमी झाला व जागीच गतप्राण झाला. दरम्यान, टाटा सुमोवरील चालकाने अपघाताच्या घटनेकडे दुर्लक्ष करत टाटा सुमो भरधाव वेगाने घेवून गेला. यावेळी रस्त्यावरील नागरीकांनी टाटा सुमोचा पाठलाग करत टाटा सुमो चालकाला ममुराबाद येथे अडकविले असून शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा तालुका पोलीस स्थानकाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते.