जिल्ह्यातील अतिवृष्टीचे तातडीने पंचनामे करा : पालकमंत्री

0
25
जिल्ह्यातील अतिवृष्टीचे तातडीने पंचनामे करा : पालकमंत्री

जळगाव, प्रतिनिधी । जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीने मोठे नुकसान झाले असून याचे तातडीने पंचनामे करण्याचे निर्देश पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. जास्त नुकसानी झालेल्या परिसरात सरसकट पंचनामे करून आपत्तीग्रस्तांना शासकीय नियमानुसार मदत प्रदान करण्याचे निर्देशही ना.गुलाबराव पाटील यांनी जिल्हा प्रशासनाला दिले आहे.

याबाबत माहिती अशी की, जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून बर्‍याच ठिकाणी अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले आहे. यात प्रामुख्याने चाळीसगाव आणि पाचोरा तालुक्यात पुन्हा एकदा महापूर आला असून इतर तालुक्यांमध्येही मुसळधार पावसामुळे शेतीची मोठी हानी झाली आहे. जिल्ह्यातील वाघूर, बोरी आणि अंजनी ही धरणे पूर्ण भरली असून गिरणा धरण भरण्याच्या मार्गावर आहे. या अनुषंगाने पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील हे जिल्ह्याबाहेर असल्याने त्यांनी आज जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्याशी चर्चा करून तात्काळ पंचनामे करण्याचे निर्देश दिले.

जिल्ह्यात अतिवृष्टीने नुकसान झाल्याचे पंचनामे करून तात्काळ मदतीचे प्रस्ताव तयार करण्यात यावेत. जिथे खूप नुकसान झाले असेल त्या परिसरात सरसकट पंचनामे करावेत अशा सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या. दरम्यान, अतिवृष्टीमुळे बर्‍याच ठिकाणी शेती वगळता नागरिकांची हानी झाली आहे. त्यांना शासकीय नियमानुसार तात्काळ मदत प्रदान करण्यात यावी अशा सूचना देखील पालकमंत्र्यांनी दिल्या आहेत. नुकसान झालेल्यांना शासकीय नियमानुसर भरपाई देण्यात येणार असल्याची ग्वाही ना. गुलाबराव पाटील यांनी दिली.

दरम्यान, तापी, वाघूर, गिरणा, बोरी आणि अंजनी नदीच्या काठावरील लोकांनी येत्या काही दिवसांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असल्याने सावध रहावे असा आवाहन देखील पालकमंत्र्यांनी केले आहे. जिल्हयात एसडीआरएफचे पथक दाखल झाले असून कुठेही आवश्यकता असल्यास तात्काळ मदत केली जाईल याची ग्वाही देखील ना. पाटील यांनी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here