जळगाव महानगरपालिकेचे सफाई व फवारणी कर्मचारी आहेत कुठे?

0
9

जळगाव ः प्रतिनिधी
जिल्ह्यात वाढत असलेल्या कोरोना संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर सर्व शासकिय यंत्रणा प्रयत्न करीत असतांना, मागील दोन ते तीन महिन्यापासून जळगाव महानगरपालिकेचे सफाई व फवारणी कर्मचारी दिसेनासे झालेले आहेत. महानगरपालिका आरोग्याधिकारी,मुकादम यांना तक्रार करून सुद्धा काही उपयोग होत नाहीये.
महानगरपालिका येथे सद्यस्थितीमध्ये ३४ फवारणी कर्मचारी आहेत.काही कर्मचारी कोविंड सेंटर व शासकीय कार्यालय येथे सेवा देत असतीलही परंतु उर्वरित कर्मचारी हे जळगाव शहरामध्ये फवारणी व साफसफाई चे काम करण्यासाठी वार्डात येत नाहीत. त्यांच्याकडून योग्य रीतीने काम करून घ्यायची जबाबदारी मनपा अधिकार्‍यांची व सत्ताधारी महापौर-उपमहापौर व पदाधिकार्‍यांची आहे. प्रत्येक वार्डात फवारणी केली तर डेंग्यु , मलेरिया, टायफाईडसारखे आजार व इतर आजारांपासून जळगाव शहरातील जनतेचे रक्षण होईल. आजच्या स्थितीत सर्व जण कोरोना सारख्या विषाणू जन्य आजाराच्या विळख्यात आहेत. महाराष्ट्र सरकारने लॉकडाऊन जाहीर केला असून त्याचे जनता पालन करीत आहे.जर शहरात साफसफाई होत नसेल तर अनेक गंभीर आजारांना आयतेच निमंत्रण मिळेल असा इशारा कॉंग्रेसचे सरचिटणीस जमील शेख यांनी दिला आहे .
ते पत्रकात पुढे म्हणातात की, शहरात सफाई कर्मचार्‍यांनी कचरा न उचलल्याने कचराकुंड्या भरलेल्या आहेत. गटरी तुंबून घाण पाणी रस्त्यावर वाहत आहे.सफाई कर्मचारी काम करत नाहीत त्याच्याकडे लक्ष देणार कोण? रोजंदारी कर्मचारी किती व कायम कर्मचारी किती?याचा मनपा कडे काहीही ताळमेळ दिसत नाही.
सफाई कर्मचार्‍यांना व फवारणी कर्मचार्‍यांना महानगरपालिकेने युनिफॉर्म दिले पाहिजे. ज्याने लोकांना कळेल की, नगरपालिका चा पर्मनंट कर्मचारी कोण आहे व रोजंदारी (ठेकेदाराचा) कर्मचारी कोण आहे आणि दोघांना वेगळ्या रंगाचा युनिफॉर्म द्यायला पाहिजे जेणेकरून लक्षात येईल की, रोजंदारी मजूर किती काम करताहेत आणि कायम कर्मचारी किती काम करत आहेत.
मागील अडीच वर्ष मनपावर भाजपाची सत्ता होती.त्याकाळात देखील शहरात घाणीचे साम्राज्य होते.नवीन महापौर-उपमहापौर यांनी शहरात प्रत्येक वार्डामध्ये स्ट्रीट लाईट,रस्ता दुरुस्ती, पाणी,साफसफाईसारख्या प्राथमिक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. तसेच शासकीय रुग्णालये आता कोविड सेंटर झाल्याने लोकांना मलेरिया, टायफाईडसारख्या आजाराकरिता खर्चाची ऐपत बर्‍याच लोकांकडे नाहीये.तरी यापुढे मनपाने लोकांच्या आरोग्याकडे व शहराच्या स्वच्छतेकडे लक्ष द्यावे अशी मागणी जमील शेख यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here