जळगाव मनपाला ‘डीपीडीसी’तून ६१ कोटींचा निधी

0
12

जळगाव ः प्रतिनिधी
केंद्र आणि राज्यात सरकार असल्याने शंभर कोटी रूपये आणू, अशा वल्गना करीत भाजपच्या नेत्यांनी जळगाव शहरासाठी काहीही केले नाही. निधीसाठी शासनाकडे बोट दाखवण्यापेक्षा तेव्हाच्या पालकमंत्र्यांनी जिल्हा नियोजन समितीमधून दरवर्षी ३० कोटी रूपये दिले असते तर, तीन वर्षात १०० कोटी रूपये खर्च होवू शकले असते. परंतु, त्यांनी काहीही केले नाही. महापालिकेत सत्तांतर झाल्यानंतर आपण तातडीने ६० कोटींचा निधी मंजुर केला असून अवघ्या पंधरा दिवसात ही सर्व कामे प्रत्यक्ष सुरू होणार असल्याची माहिती पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
मनपात भाजपची सत्ता आली तेव्हा केंद्र व राज्यात भाजपचीच सत्ता होती. स्थानिक पालकमंत्री आणि जळगाव महापालिकेची जबाबदारी घेणारे माजी मंत्री गिरीश महाजन हे तेव्हाच्या मुख्यमंत्र्यांशेजारी बसायचे. त्यामुळे त्यांनी शहराचा विकास करणे आवश्यक होते. परंतु, त्या बाबतीत जळगावकर दुर्दैवी ठरले. मुख्यमंत्र्यांकडून १०० कोटी आणू या घोषणेनंतर अनेक वर्षेे त्यांचे निधीच्या वाटपावरून भांडत होते. कोणत्या वार्डात कोणाचा नगरसेवक यावरून रस्सीखेच सुरू होती. ज्या निधीवरून भांडणे सुरू होती, तो अपेक्षेप्रमाणे आलाच नाही. नेत्यांनी देखील शहराची जबाबदारी झटकटून दिली. महापालिकेत शिवसेनेची सत्ता आल्यानंतर आम्ही कोणत्याही घोषणा केल्या नाहीत, जे करू ते कृतीतून करणार आहोत. ६१ कोटी रूपयांच्या कामांची सर्व तांत्रीक मान्यता झाल्यानंतर यासाठी नियोजन समितीमधून विविध योजनांसाठी ६१ कोटी रूपयांचा निधी महापालिकेला दिला आहे. अवघ्या १५ दिवसांत ही सर्व कामे मार्गी लागतील असे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले. महापौर जयश्री महाजन, उपमहापौर कुलभूषण पाटील, नितीन लढ्ढा, विष्णू भंगाळे, विरोधीपक्षनेते सुनील महाजन, शिवसेना महानगरप्रमुख शरद तायडे, अनंत जोशी, नितीन बरडे आदी उपस्थित होते. शहरात कामे करताना शहर हाच निकष आहे. वॉर्डात भाजपचा नगरसेवक आहे की शिवसेनेचा हे पाहणार नाहीत. सर्व शहरात सरसकट कामे होतील. कामांच्या गुणवत्तेवर लक्ष राहणार असल्याचे पालकमंत्री म्हणाले.
…तरीही तापी महामंडळाचे ‘पात्र’ कोरडेच राहिले
माजी मंत्री गिरीश महाजन यांना भाजप सरकारमध्ये जलसंपदासारखे महत्वाचे खाते मिळाले होते. त्यांना या पदाचे महत्व कळाले नाही. जिल्ह्याचा मंत्री असूनही त्यांनी तापी महामंडळात दखलपात्र काम केले नाही. जिल्ह्यातील एकही सिंचनाचा प्रकल्प मार्गी लावला नाही. बलून बंधारे हवेतच आहेत. पाडळसरे धरणही होवू शकले नाही. महाजन यांच्यासह तेव्हाचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे देखील अपयशी ठरले, अशी टीका पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी येथे केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here