जळगाव जि.प.तही सत्तांतरासाठी माजी मंत्री खडसेंकडून हालचाली

0
7

जळगाव ः प्रतिनिधी
जिल्हा परिषदेतील आपल्याच एकेकाळच्या समर्थक पदाधिकार्‍यांकडून अपेक्षित सहकार्य मिळेनासे झाल्याने महाविकास आघाडीच्या माध्यमातून तिथे सत्तांतर घडवून आणण्याच्या हालचाली राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते,माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी सुरू केल्या आहेत.शुक्रवारी सायंकाळी त्या अनुशंगाने खडसे यांच्या निवासस्थानी एक बैठक झाली असून कॉंग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे गटनेते या बैठकीला उपस्थित होते.
जळगाव महानगरपालिकेत नुकतेच शिवसेनेने सत्तांतर घडवून आणले. त्यात खडसे यांचे काहीच योगदान नव्हते, असा प्रचार या सत्तांतराच्या वेळी करण्याचा प्रयत्न काही बंडखोर नगरसेवक आणि शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांनी केला होता. त्या पार्श्‍वभूमीवर जिल्हा परिषदेत एकहाती सत्तांतर घडवून आणण्याच्या तयारीला खडसे लागले आहेत, असे सांगण्यात येते. त्या पार्श्‍वभूमीवर शुक्रवारी झालेल्या या बैठकीकडे पाहिले जाते आहे. माजी आमदार डॉ. गुरूमुख जगवाणी, शिवसेनेचे गटनेते रावसाहेब पाटील, कॉग्रेसचे गटनेते प्रभाकर सोनवणे, राष्ट्रवादीचे गटनेते शशिकांत साळुंखे,उपगटनेते रविंद्र पाटील, माजी नगरसेवक अशोक लाडवंजारी, सुनिल माळी, डॉ.अभिषेक ठाकूर, अशोक चौधरी यांची उपस्थिती होती.
पदाधिकारी होते खडसे समर्थक
जिल्हा परिषदेत वर्षभरापूर्वी अध्यक्षपदाच्या निवडीच्या वेळी असंतुष्ट खडसेंच्या मदतीने भाजपच्या सदस्यांना फोडून सत्ता मिळवण्याचा महाविकास आघाडीचा प्रयत्न होता पण भाजपने त्या वेळी खडसे समर्थकांनाच उमेदवारी दिल्याने त्या वेळी सर्वच पदाधिकार्‍यांची निवड सहज होऊ शकली होती मात्र, खडसे यांनी सत्तांतर केल्यानंतर जिल्हा परिषदेतील त्या पदाधिकार्‍यांनी आपल्या निष्ठा भाजपकडेच ठेवल्याचे समोर येऊ लागले. या बैठकीतून काय निष्कर्ष निघाला हे मात्र समोर आले नाही.
हवी तीन चतुर्थांश मते
जि.प.चे अध्यक्षपद महिलेकडे आहे. त्यामुळे त्यांच्यावर अविश्‍वास प्रस्ताव मंजूर करण्यासाठी एकूण सदस्य संख्येच्या तीन चतुर्थांश सदस्यांच्या मतांची आवश्यकता भासेल. तितकी मते जमू शकतात का, याचा आढावा बैठकीत झाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here