जळगाव, प्रतिनिधी । कांचननगर परिसरातील १२ वर्षीय बालकाने राहत्या घरात गळफास घेवून शुक्रवारी सकाळी १०.३० वाजता आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. मकरसंक्रात सारख्या सणासुदीच्या दिवशी ही घटना घडली. याबाबत कळताच नातेवाईकांनी आक्रोश केला.
यश रमेश राजपूत (वय १२, रा. कांचननगर) असे मृत बालकाचे नाव आहे. रमेश सुकलाल राजपूत हे पत्नी, मुलगा आणि मुलीसह कांचननगर राहतात रमेश राजपूत हे शुक्रवारी सकाळी ७ वाजता कृषी उत्पन्न बाजार समितीत कामाला गेले. त्यांची पत्नीही सकाळी स्वयंपाक करून घरकामासाठी बाहेर गेल्या. मुलगा यश आणि मुलगी सोनी हे दोघेच घरी होते. यश राजपूत हा घराच्या वरच्या खोलीत सकाळी १० वाजेच्या सुमारास गेला. त्याने दोरीने गळफास घेवून आत्महत्या केली. ही घटना त्याची बहिण सोनीच्या लक्षात आल्याने उघडकीस आली. यशला नातेवाईकांच्या मदतीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. मात्र, त्यास वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत जाहीर केले. याबाबत कळताच नातेवाईकांनी रूग्णालयात धाव घेतली. बालकाचा मृतदेह पाहून नातेवाईकांनी आक्रोश केला. याबाबत शनिपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे.