जळगाव, प्रतिनिधी । शहरातील चौघुले प्लॉट परिसरात रविवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास एका सलून व्यवसायिक तरुणाची चॉपरने वार करून निर्घृण हत्या करण्यात आली. तरुणाला गंभीर अवस्थेत जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता त्याची प्राणज्योत मालवली.
ममुराबाद रस्त्यावर असलेल्या प्रजापत नगरात राहणाऱ्या सुनील सुरेश टेमकर वय-३६ या तरुणाचे चौघुले प्लॉट परिसरात सलून दुकान आहे. गेल्या ५ दिवसांपासून तो आजारी असल्याने त्याचे दुकान बंद होते. रविवारीच त्याने दुकान उघडले होते.
रात्री १० वाजेच्या सुमारास त्याच्यावर कुणीतरी चॉपरने वार केल्याने त्याला गंभीर दुखापत झाली. जखमी अवस्थेत त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असता त्याची प्राणज्योत मालावली. जिल्हा रुग्णालयात शनीपेठ पोलीस ठाण्याचे निरीक्षक बळीराम हिरे हे पथकासह पोहचले असून परिस्थिती नियंत्रणात आहे.
मयताच्या पश्चात आई, पत्नी योगिता, मुलगा रोनक, मुलगी दीप्ती, भाऊ असा परिवार आहे. पोलीस हल्लेखोराचा शोध घेत आहे.