जळगाव । वाघनगरजवळील जिजाऊनगर परिसरात गुरुवारी मध्यरात्री चोरट्यांनी बंद घर फोडल्याची घटना शुक्रवारी ७ जानेवारी रोजी सकाळी उघडकीला आली आहे. चोरट्यांना घरात काहीही मुद्देमाल आढळून न आल्याने खाली हात परतावे लागले. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जिजाऊनगरात सतीश नाना बाविस्कर (वय-३५, रा. जिजाऊनगर) हे पत्नी अनिता व दोन मुलांसह वास्तव्याला असून ते एमआयडीसीतील खासगी कंपनीत नोकरीला आहे. ६ जानेवारी रोजी सतिष बाविस्कर यांची रात्रपाळीसाठी कामावर होते. त्यामुळे त्यांची पत्नी अनिता ह्या मुलगा अक्षय आणि मुलगी प्रज्ञा यांच्यासह त्यांच्या भावाच्या घरी रात्री झोपण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी त्यांनी घराला कुलूप लावले होते. शुक्रवारी सकाळी ८ वाजेच्या सुमारास त्या मुलांसह घरी गेल्या असता त्यांच्या घराच्या दरवाजाचे कुलूप तोडलेले दिसून आले. चोरट्यांची चोरी केल्याचा प्रकार समोर आला. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीसांना माहिती देण्यात आली. सतीश बाविस्कर यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.