चिपी विमानतळाशी शिवसेनेचा काय संबंध? पण मुख्यमंत्र्यांनी उद्घाटनाला यावे – आशिष शेलार

0
4

मुंबई : प्रतिनिधी

केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी काल पत्रकार परिषद घेत ९ ऑक्टोबरला चिपी विमानतळाचे उद्घाटन होणार असल्याची माहिती दिली. तसेच उद्घाटनाला मुख्यमंत्री असायला हवे असे काही नाही, संबंधित खात्याचे केंद्रीय मंत्री उपस्थित राहणार असल्याचे म्हणत, त्यांनी शिवसेनेला (Shiv Sena) डिवचले. यावरून शिवसेनेचे नेतेही आक्रमक झाले असून याबाबतचा निर्णय राणे घेऊ शकत नाहीत, असे म्हटले आहे. दरम्यान, राणेंच्या या विधानाशी भाजपचे आमदार आशिष शेलार (Ashish Shelar) यांनीही फारकत घेतली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांचा सन्मान राखला पाहिजे. त्यांनी चिपी विमानतळाच्या उद्घाटनाला आलं पाहिजे. सोबतच चिपी विमानतळाशी विनायक राऊत (Vinayak Raut) आणि शिवसेनेचा काय संबंध? असा सवाल करत शिवसेनेला डिवचण्याचे कामही केले.

 

आशिष शेलार यांनी आज माध्यमांशी संवाद साधला असता त्यांना राणेंच्या विधानाबाबत विचारण्यात आलं. त्यावर त्यानी ही प्रतिक्रिया व्यक्त केली. मी प्रोटोकॉल अधिकारी नाही. पण महाराष्ट्राचा नागरिक म्हणून माझे मत आहे की, भले शिवसेनेच्या प्रयत्नाने चिपी विमानतळ झालं नसेल, भाजपच्या मुहूर्तमेढीमुळे झालं असेल तरी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा सन्मान व्हायला हवा. त्यांनी उद्घाटनाच्या कार्यक्रमाला यायला पाहिजे, असं शेलार म्हणाले.

यावेळी त्यांनी विनायक राऊत आणि शिवसेना यांचा चिपी विमानतळ उभारणीशी संबंध काय? असा प्रश्नही उपस्थित केला. चिपी विमानतळाचं १९९९ला भूमिपूजन झालं तेव्हा केंद्रात भाजपचे सरकार आणि पंतप्रधान होते. त्यावेळी ज्या कॅबिनेटमध्ये निर्णय झाला त्यात विनायक राऊत होते का? त्यांचा कोकण रेल्वेशी कधीच संबंध आला नव्हता. चिपी विमानतळाबाबत विनायक राऊत यांनी वायफळ बोलू नये. नारायण राणे आता केंद्रीय कॅबिनेटमध्ये आहेत. भाजप या विषयाचा पाठपुरावा करते आहे. या प्रकल्पाची मुहूर्तमेढच भाजपने केली आहे. उद्घाटन होणार आहे म्हटल्यावर चालत्या गाडीमध्ये शिरण्याचा प्रकार विनायक राऊत करत आहेत. जर हे श्रेय तुमचे होते तर ते गेल्या १५ वर्षांत विमानतळाचे काम पूर्ण का झाले नाही? भाजपचे प्रयत्न आणि राणेंचा पाठपुरावा यावर हा प्रकल्प उभा राहिला आहे याचा आम्हाला आनंद आहे, असं सांगतानाच विनायक राऊत यांनी उद्घाटनाची तारीख जाहीर करणे हे कुठल्या घुसखोरी कायद्यात बसते? अशा खटाटोपाने लोकांची मते मिळत नाहीत, तर अप्रमाणिकता दिसते, असा टोलाही त्यांनी लगावला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here