गुजरातला १,००० कोटी दिले, महाराष्ट्रालाही १,५०० कोटी द्या; राऊतांची पंतप्रधानांकडे मागणी

0
9

मुंबई: प्रतिनिधी

कोकण किनारपट्टीला निसर्ग चक्रीवादळाचा तडाखा बसल्यानंतर अवघ्या वर्षभरातच पुन्हा कोकणातील सिंधुदुर्ग, रायगड समुद्र किनाऱ्यालगतच्या जिल्ह्यांना तौक्ते चक्रीवादळाचा (Tauktae cyclone) तडाखा बसला आहे. त्यामुळे या जिल्ह्यांना राज्य सरकारकडून मदतीची अपेक्षा असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी तौक्ते चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीच्या भरपाईसाठी गुजरातला १,००० कोटींच्या मदतीची घोषणा केली आहे. महाराष्ट्र आणि गोव्यातही या वादळामुळे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे पंतप्रधान मोदी यांनी महाराष्ट्राला १,५०० कोटींची मदत दिली पाहिजे, अशी मागणी शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केली.

ते गुरुवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी ते म्हणाले, पंतप्रधान मोदी आणि केंद्रातील नेते हे दिलदार आहेत. मोदी यांचे संपूर्ण देशावर लक्ष असते. त्यामुळे ते महाराष्ट्राला तौक्ते चक्रीवादळातील नुकसान भरपाईसाठी १,५०० कोटींची मदत नक्कीच देतील. पंतप्रधानांनी गुजरातला तात्काळ मदत जाहीर केली. त्याविषयी आम्हाला दु:ख असण्याचे कारण नाही. मात्र, कधीतरी पंतप्रधान मोदींचे विमान महाराष्ट्राकडेही वळेल, अशी अपेक्षा मी व्यक्त करतो. पण महाराष्ट्र आणि गोव्याला केंद्र सरकारने अनुक्रमे १,५०० आणि ५०० कोटींची मदत जाहीर करावी, अशी मागणी संजय राऊत यांनी केली.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हेदेखील आज कोकणच्या दौऱ्यावर आहेत. त्यामुळे तेदेखील केंद्र सरकारला कोकणात झालेल्या नुकसानीची माहिती देतील. तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही हेदेखील शुक्रवारी कोकणाचा दौरा झाल्यानंतर केंद्र सरकारकडे मदतीची मागणी करतील, असे संजय राऊत यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here