मुक्ताईनगर : प्रतिनिधी I तालुक्यातील खामखेडा येथे मावस भावाकडे लग्नानिमित्त आलेल्या रावेर तालुक्यातील महिलेच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणात हरवल्याची नोंद केल्या नंतर निष्काळजीपणामुळेच व वेळेवर जिल्हा पोलीस अधीक्षकांना हरवल्याचा ईमेल न पाठवल्याने नाहक जीव गेल्याचा आरोप निळा निशानचे संस्थापक अध्यक्ष आनंद बाविस्कर यांनी केला आहे.
विटवा तालुका रावेर येथील ज्योती विलास लहासे वय 31 या विवाहित महिलेचे प्रेत खामखेडा गावापासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या सुकडी वन विभागाच्या 441 व 442 हद्दीत असलेल्या एका साचलेल्या नाल्याच्या पाण्या ठिकाणी 31 डिसेंबर रोजी आढळून आला होता. सदर घटने प्रकरणी निळा निशानचे संस्थापक अध्यक्ष आनंद बाविस्कर यांनी पत्रकार परिषद घेऊन मिसिंग नोंद करणाऱ्या तसेच मिसिंगचा तपास करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला होता.
याबाबत मिळालेली माहीती अशी की, सदर महिला ही 28 डिसेंबर रोजी शौचालयात जाते असे सांगून दुपारी साडेबाराच्या सुमारास खामखेडा येथील आपल्या मावस भावाच्या घरून निघाली होती. तिचा मृतदेह 31 डिसेंबरला आढळून आला होता 28 डिसेंबरला मयत महिलेच्या मावस भावाच्या तक्रारीवरुन तिच्या हरवल्याची नोंद मुक्ताईनगर पोलिसात करण्यात आली होती व या हरवलेल्या तक्रारीचे तपासाचे जबाबदारी पोलीस हेडकॉन्स्टेबल संदीप खंडारे यांच्याकडे देण्यात आली होती 28 डिसेंबरला मिसिंग दाखल झाल्यानंतर तब्बल चार दिवसापर्यंत कोणत्याही प्रकारची कारवाई अथव साधी चौकशीही संदीप खंडारे यांच्यामार्फत करण्यात आली नव्हती विशेष म्हणजे मिसिंग दाखल झाल्यानंतर तात्काळ तसा ईमेल जिल्हा पोलीस अधीक्षकांना द्यावा लागतो मात्र प्रत्यक्षात सदर ई-मेल हा एक तारखे नंतर देण्यात आल्याचा आरोप बाविस्कर यांनी पत्रकार परिषदेत केला . 28 डिसेंबरला मिसिंग दाखल झाल्यानंतर तत्काळ तसा ई-मेल जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे पाठविण्यात आला असता, तर सदर महिलेच्या फोनचे शेवटचे लोकेशन काढून तपास करणे सोपे गेले असते व त्यातून कदाचित या महिलेचे प्राण वाचू शकले असते. मात्र पोलिस हेडकॉन्स्टेबल खंडारे यांच्या निष्काळजीपणामुळे व दुर्लक्षपणामुळे सदर महिलेचा जीव गेल्याचा आरोप बाविस्कर यांनी केला आहे.
दरम्यान , विशेष म्हणजे मुक्ताईनगर पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालेल्या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी मोठ्या प्रमाणात हलगर्जीपणा हा कायम करण्यात येतो. विशेषतः गुन्हा मीसिंगचा असेल तर जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात येते. त्यात हरवलेले व्यक्ती ही स्त्री किंवा पुरुष कोणीही असो मात्र वयाने कमी असेल तर जाणीवपूर्वक याकडे दुर्लक्ष केले जाते. बहुतांशी वेळेस तरुण मुले – मुली हे पळून जातात त्यामुळे पोलिस तपासा कडे दुर्लक्ष करतात व त्यातूनच अशा दुर्दैवी घटना समोर येतात. यासंदर्भात यापूर्वी देखील दोन – तीन वेळेस पोलिसांनी दुर्लक्ष केल्याने काही जणांना आपल्या प्राणास मुकावे लागले आहे. यासंदर्भात जिल्हा पोलिस अधीक्षकांनी याकडे गांभीर्याने लक्ष घालून या प्रकरणी चौकशी करून योग्यती कारवाई करावी अशी मागणी परिसरातून केली जात आहे.