जळगाव : प्रतिनिधी
शाळेला उन्हाळ्याच्या सुट्या लागल्या की मुलांना मामाच्या गावी तर महिलांना माहेरी जायचे वेध लागतात आणि यासाठी निमित्त असते आखाजी सणाचे. खान्देशात आखाजी धूमधडाक्यात साजरी केली जाते; मात्र गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाचे संकट व कडक निर्बंध असल्याने मनात असूनही माहेरी जाणार्या महिलांना सासरीच आखाजी साजरी करावी लागणार आहे.
अक्षय्य तृतीयेला खान्देशात घरोघरी पाण्याची घागर भरली जाते. त्याच्यावर छोटं मातीचं भांडं ठेवून त्यावरती खरबूज आणि दोन सांजोर्या, दोन आंबे ठेवतात. छोटं भांडं पितरांसाठी. आधी त्यांना पाण्याचा घोट देऊन मग नवीन माठ वापरण्यात येतो. पितरांचे श्राद्ध, तर्पणविधी होतो. सकाळी उंबरठ्याचं औक्षण घेऊन पूर्वजांचं स्मरण करून कुंकवाचा एकेक बोट उंबर्यावर उमटवत आणि एकेक नाव उच्चारत पितरांना आमंत्रण दिलं जातं. दुपारी ‘घास’ टाकतात. आमरस, पुरणपोळी, कटाची आमटी, भजी, कुरडई असा बेत असतो. खरे तर अक्षय्य तृतीयेपासून आंबे खायला सुरुवात करतात. दरम्यान, दरवर्षी या दिवशी मुलगी, नातवंडे आजोळी असतात. कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने व जिल्हाबंदी असल्याने मुले घरीच आहे. आजोळी नसल्याने अनेकांनी आखाजीच्या पूर्वसंध्येला व्हिडिओ कॉलद्वारे मुलीशी व नातवंडांशी संवाद साधला.
सासरी गेलेल्या लेकींना वर्षातून २ वेळा दिवाळी व आखाजीला माहेरी जायला मिळतं. दिवाळी घाईची तर आखाजी म्हणजे विसाव्याचा सण. सासरच्या घबडग्यातून, कामाच्या व्यापातून तेवढाच आराम. त्यामुळे या सणाची सासुरवाशिणी आतुरतेने वाट बघत असतात; मात्र यंदाही कडक निर्बंधांमुळे महिला माहेरी जाऊ शकत नसल्याने नाराजी आहे. माहेरी आलेल्या सासुरवाशीणचे कौतुक केले जाते. आमरस, पुरणपोळीचं गोड जेवण, पुडाच्या पाटोड्या आदी पदार्थ असतात. ग्रामीण भागात तर आंब्याच्या झाडाखाली पथार्या टाकल्या जातात. गप्पागोष्टी, चेष्टा मस्करी सुरू असते. यानंतर आंब्याच्या झाडांना झोके बांधले जातात. या वेळी आथानी कैरी तथानी कैरी, कैरी झोका खाय वं… कैरी तुटनी खडक फुटना, झुयझुय पानी व्हायं वं… असे गाणे म्हणत सण साजरा केला जातो. मात्र यंदा सासुरवाशीण माहेर जाऊ न शकल्याने ही गाणी सोशल मीडियावर व्हायरल केली जात असून, त्यातून आपल्या विविध आठवणींना उजाळा दिला जात आहे.