आ. पाटील यांनी श्रेय घेण्याचा केविलवाणा प्रयत्न करु नये – ऍड.रोहिणीताई खडसे

0
4

मुक्ताईनगर : प्रतिनिधी

मुक्ताईनगर शहरातील जुने गावातील नागेश्‍वर मंदिराकडून जुने कोथळीतील मुक्ताई मंदिराकडे जाताना, निंबादेवी मंदिराजवळील पूल व त्यासाठीचा निधी माजी मंत्री एकनाथराव खडसे, खासदार रक्षाताई खडसे यांनी नाबार्ड अंतर्गत मंजूर करून आणला. आ. चंद्रकांत पाटील यांनी श्रेय घेण्याचा केविलवाणा प्रयत्न करु नये. त्याऐवजी मतदार संघातील मेळसांगवे-पंचाणे मार्गे सुलवाडी ते ऐनपूर रस्त्यावरील पूल मंजूर करुन आणावा. तसे केल्यास आम्ही जाहीर सत्कार करू. त्यांनी आमचे आव्हान स्वीकारावे, असे जिल्हा बँकेच्या अध्यक्षा रोहिणीताई खडसे-खेवलकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

जुने मुक्ताईनगरातील नागेश्‍वर मंदिराकडून जुन्या मुक्ताबाई मंदिराकडे जाताना रस्त्यात ढासळलेला पूल आहे. तेथे नवीन पूल उभारणीचे भूमिपूजन मंगळवारी सकाळी आमदार चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते पार पडले. यानंतर ऍड. रोहिणी खडसे-खेवलकर यांनी त्यांचे संवेदना फाउंडेशनच्या कार्यालयामध्ये दुपारी ४ वाजता पत्रकार परिषद घेतली. त्यात खडसे म्हणाल्या की, चांगदेव मंदिर-मानेगाव-जुनी कोथळी गजानन महाराज मंदिर मुक्ताईनगर ते राज्य महामार्ग ६ रस्ता प्रजिमा ९१ मध्ये निंबादेवी मंदिराजवळ मोठ्या पुलाची पुनर्बांधणीसाठी माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी आमदार असतानाच तत्कालिन सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे नाबार्ड अंतर्गत पाठपुरावा केला. त्यानुसार पुलासाठी २०१९ मध्ये दीड कोटी रुपये मंजूर झाले होते. तो निधी आल्यावर आमदार पाटील यांनी भूमिपूजन करून श्रेय घेण्याचा प्रयत्न चालवला आहे. त्यांनी स्वत:च्या कामांचे श्रेय घ्यावे. नाथाभाऊंनी केलेल्या कामाचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करू नये. श्रेयच घ्यायचे असेल तर मेळसांगवे-पंचाणे- सुलवाडी-ऐनपूर हा तापी नदीवरील हा पूल करून दाखवावा. ते काम केल्यास आम्ही त्यांचा जाहीर सत्कार करू, असे आव्हान दिले. कृउबा सभापती निवृत्ती पाटील, चंद्रशेखर बढे, राजेंद्र माळी, सुनील काटे उपस्थित होते.

आमदार पाटील यांचे हस्ते भूमिपूजन

जुने गाव नागेश्‍वर मंदिर मार्ग ते संत मुक्ताई मंदिरा दरम्यान मुख्य मार्गावरील ढासळलेला पूल नव्याने करावा, अशी रहिवासी तसेच वारकर्‍यांची मागणी होती. त्या नुसार मंजूर करून आणलेल्या कामाचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते साध्या पद्धतीने भूमिपूजन झाले. हा पूल पूर्णा नदीच्या बॅक वाटर असलेल्या मुक्ताई घाटाजवळ आहे. या वेळी कॉंग्रेसचे जिल्हा सरचिटणीस डॉ.जगदीश पाटील, राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष यू.डी.पाटील, शिवसेना तालुकाप्रमुख छोटू भोई, अशोक नाईक, अफसर खान, पवन खुरपडे, नीरज बोरखेडे, गणेश टोंगे, गट नेते राजेंद्र हिवराळे, नगरसेवक संतोष मराठे, अभियंता एल.सी.सावखेडकर, प्रशांत पाटील उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here