अहमदनगर महापालिकेवर सेनेचा भगवा फडकवण्यासाठी राष्ट्रवादीची साथ नको

0
3

सतत आमच्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याच्या भावनेतून शहर शिवसेनेतील राठोड समर्थक गटाने आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यातूनच आता आगामी महापौरपदाच्या उमेदवारीसाठी शिवसेनेतील रिता शैलेश भाकरे व रोहिणी संजय शेंडगे (Rohini Shagane) या दोन नावांमध्ये रस्सीखेच सुरू झाली आहे. परवा, गुरुवारी शहरातील शिवसेनेचे काही पदाधिकारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीला मुंबईत गेले होते. या गटाचा महापौरपदासाठी राष्ट्रवादीशी आघाडी करण्याचा विचार असल्याने राठोड समर्थक गटाने आक्षेप नोंदवला आहे. त्या विरोधात आता निष्ठावान गट इच्छुक उमेदवार रिता भाकरे यांना समर्थन देण्यासाठी पुढे सरसावला आहे.

 

उमेदवारी आणि सेनेच्या जास्तीत जास्त नगरसेवकांचा आपल्याला पाठिंबा मिळावा यासाठी रिता भाकरे यांनी काल, शुक्रवारी रात्री स्नेहभोजनासहित बैठक आयोजित केली. महापालिकेत शिवसेनेचे सर्वाधिक २३ नगरसेवक आहेत. यातील केवळ तीन नगरसेवक वगळता उर्वरित सर्व नगरसेवकांचा आपल्याला पाठिंबा असल्याचा दावा रिता भाकरे (Rita Bhakre) यांनी केला आहे. आगामी महापौरपद हे अनुसूचित जाती महिलेसाठी राखीव आहे. या पदासाठी भाजपकडे उमेदवार नाही. तर काँग्रेस व राष्ट्रवादीकडे प्रत्येकी एक व शिवसेनेकडे दोन इच्छुक आहेत. परंतु मनपातील पक्षीय बलाबल विचारात घेता कोणत्याही पक्षाला युती-आघाडी केल्याशिवाय महापौरपद मिळवणे अशक्य आहे.

सध्याचे महापौरपद भाजपचे बाबासाहेब वाकळे यांनी राष्ट्रवादीच्या मदतीने मिळवले. सर्वाधिक नगरसेवक असूनही शिवसेनेला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी राष्ट्रवादीने भाजपला पाठिंबा दिला. त्याचे पडसाद राज्यपातळीवर उमटले. आता राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस यांची महाविकास आघाडी असल्याने त्याचा फायदा नगरमध्ये मिळावा व महापौरपद मिळावे अशी शिवसेनेकडून मागणी केली जात आहे. मात्र त्यासाठी राष्ट्रवादीच्या पाठिंब्याची आवश्यकता भासणार आहे. राष्ट्रवादीचा पाठिंबा घेण्यावरून शिवसेनेमध्ये दोन गट निर्माण झाले आहेत. राठोड समर्थक निष्ठावान गटाचा राष्ट्रवादीशी आघाडी करण्यास तीव्र विरोध आहे. काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) यांच्या भेटीला गेलेल्या शिष्टमंडळाने आपल्याला डावलल्याची भावना राठोड समर्थकांकडून व्यक्त केली जात आहे. या शिष्टमंडळासमवेत इच्छुक रोहिणी शेंडगे यांचे पती संजय शेंडगे होते. त्यातूनच राठोड समर्थक गट आता आक्रमक झाला आहे.

शहरातील राठोड समर्थकांची भूमिका मांडण्यासाठी लवकरच मुख्यमंत्र्यांची भेट घेण्याचा निर्णय झाला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आता राठोड समर्थक नगरसेवक भाकरे यांच्या पाठीशी एकवटताना दिसत आहेत. त्यातूनच महापौरपदाच्या उमेदवारीसाठी आता शिवसेनेच्या दोन उमेदवारांत रस्सीखेच सुरू झाली आहे. राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांनी यापूर्वीच भाजप नगरसेवकांची बैठक घेत व्यूहरचना आखण्यास सुरुवात केली आहे. दोन दिवसांपूर्वी शिवसेनेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांसह झालेल्या ऑनलाईन बैठकीतही आ. जगताप यांनी हजेरी लावली होती, अशी चर्चा सध्या जोरात सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here