अवैध धंद्यांवर जिल्हा पोलीस अधिक्षक मुंडेंचे धाड सत्र स्वागतार्ह !

0
2

जळगाव : विशेष प्रतिनिधी
जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंडे काल स्वतः रस्त्यावर उतरले व त्यांनी शहरातील सर्व सहा पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील तब्बल 9 अवैध धंद्यांच्या ठिकाणी धाडी टाकल्या.त्यात सट्टा-जुगाराचे साहित्य व लाखो रुपये जप्त करण्यात आले व अनेक जुगारी कारभाऱ्यांना ताब्यात घेण्यात आले. पोलीस अधीक्षकांच्या या कारवाईने येथील तत्कालीन पोलिस अधीक्षक संतोष रस्तोगी यांच्या कार्याची आठवण झाली.मुंडे साहेब रस्त्यावर उतरले व त्यांनी आपल्याच पोलीस दलातील अधिकाऱ्यांना उघडे पाडले आहे.त्यांच्या या कारवाईचे शहरात स्वागत होत असतांनाच आता “त्या“ सहा पोलिस निरीक्षकांचे काय ?,अर्थात त्यांच्यावर काय कारवाई होणार ?हा प्रश्न शहरात चर्चेत आला आहे व लोकांना त्याची उत्कंठा लागून राहिली आहे.

पोलीस अधीक्षक मुंडे यांनी स्थनिक गुन्हे शाखेचे निरीक्षक बकाले यांना सोबत घेत एकूण नऊ पथके तयार करून शहरातील अवैध धंदे जसे सट्टा, जुगार व पत्त्यांच्या क्लब वर काल एकाचवेळी धाडी टाकल्या. शहरातील शहर,शनीपेठ,जिल्हा पेठ,औद्योगिक वसाहत रामानंद आणि तालुका पोलीस ठाण्यांच्या हद्दीत या धाडी टाकल्याचे सांगण्यात येते म्हणजेच या सहाही पोलीस ठाण्यांतर्गत अवैध धंदे अगदीच राजरोसपणे सुरू होते हे स्पष्ट आहे.स्वतः मुंडे साहेब रस्त्यावर उतरले व त्यांनी चांगले कार्य केले त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करणे योग्य ठरते पण त्याचबरोबर प्रश्न उपस्थित होतो की, पोलीस अधीक्षक स्वतःच अवैध धंद्यांवर छापे टाकत असतील तर स्थानिक पोलीस ठाण्यांचे काय ?

सर्वच पोलीस ठाण्यात गुप्त वार्ता (डिटेक्टिव्ह ब्रँच) म्हणजे डीबी विभाग कार्यरत आहे आणि त्या विभागात जवळपास सर्वच पोलीस ठाण्यात सातत्याने तेच-ते तेच पोलीस कर्मचारी नियुक्तीस दिसतात.वर्षानुवर्षे ठराविक पोलीस कर्मचारी डीबी विभागातच काम करतात.कदाचित जिल्हा पोलीस दलात तेच लोक कार्यक्षम असावेत? बाकीसारे … शहरातील त्या-त्या पोलीस ठाण्यांच्या अंतर्गत असलेले अवैध धंदे, गुन्हेगारी, दादा–गिरी, असामाजिक कार्य, समाजकंटकांना आवरण्याचे त्यांचे काम म्हणावे. विशेष करून डीबी वाल्यांचे आशा प्रकारच्या लोकांशी अगदी सलोख्याचे संबंध असल्याचे म्हटले जाते. म्हणूनच कोणत्याही पोलीस ठाण्यात नवीन अधिकारी नियुक्तीस आले की, त्याच लोकांची विचारपूस केली जाते,असे पोलीसच सांगतात.

पोलीस दलात असा अलिखित नियम किंवा आदेश आहे की,ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध व्यवसाय आढळून येतील त्या-त्या ठाणे प्रभारी अर्थात निरीक्षकावर कारवाई करण्यात येईल.पोलीस दलाच्या वेळोवेळी होणाऱ्या क्राईम मिटिंगमध्ये हा विषय सतत उगाळाला गेला आहे.तशा मिटिंगमधून पोलीस अधीक्षक आपल्या पोलीस निरीक्षकांना तशी तंबीच देत असतात व तशाप्रकारची कारवाई काही पोलीस निरीक्षकांवर झाल्याची उदाहरणे आहेत.तोच धागा पकडून पोलीस अधीक्षकांच्या कालच्या कारवाई वरून शहरात प्रश्न विचारले जात आहेत.

जळगावचे तत्कालीन पोलीस अधीक्षक(एसपी) संतोष रस्तोगी यांनी अशाचप्रकारे शहरातील कोणत्याच ठाणे निरीक्षकाला कळू न देता भुसावळच्या पोलीस उपाधीक्षकांना सोबत घेत व त्यांचे विशेष पथक तयार करून शहरात सामाजिक,सांस्कृतिक व क्रीडा मंडळाच्या नावाखाली चालणाऱ्या जुगार अड्ड्यांचा भांडाफोड केला होता व त्यावेळी काही नगरसेवक मंडळींना अटक करून खळबळ उडवून दिली होती.त्यांच्या त्या कारवाईचा स्थानिक पोलिसांना थांगपत्ता नव्हता आणि त्यांनी नंतर शहर ,शनीपेठ पोलीस ठाण्यांच्या निरीक्षकांसह तत्कालीन उपअधीक्षक (डीवायएसपी) अविनाश अंबुरे यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला होता.ते विसरण्यासारखे नाही.
आताही स्वतः पोलीस अधीक्षक मुंडे यांनी स्वतः रस्त्यावर उतरून सट्टा व जुगाराच्या अड्ड्यांवर धाडी टाकल्या आहेत.शहरातील सहाही पोलीस ठाण्यांच्या हद्दीत ही कारवाई केली असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे जेव्हा पोलीस अधीक्षक अशाप्रकारची कारवाई स्वतःच करतात तेव्हा स्थानिक अधिकाऱ्यांवर बोट उचलले जाणे स्वाभाविक ठरते. अधीक्षक कारवाई करतात तर मग संबंधित पोलीस ठाणे निरीक्षक व डीबी पथकातील कर्मचारी काय करतात? हा प्रश्न आहे किंबहुना सारे काही त्यांच्याच संमतीने चालत असते असे म्हणणे वावगे ठरू नये.

जळगाव जिल्ह्यात अवैध धंद्यांवर कारवाई करण्याबद्दल सर्वप्रथम अतिरिक्त पोलीस अधीक्षक टी. एस. भाल यांचे नाव घेतले जाते.ते खरोखरीच अवैध धंद्यांचे कर्दनकाळ होते.त्यांच्या नुसत्या नावाने अवैध व्यावसायिकांना धडकी भरे. नंतर तसाच दरारा अधीक्षक दीपक जोग यांचा राहिला होता.त्यानंतर सारेच अलबेल. मात्र संतोष रस्तोगी लौकिक ठेऊन गेले,तसाच लौकिक मुंडे यांचाही ठरावा.

पोलीस अधीक्षक मुंडे यांनी ज्या-ज्या पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील अवैध धंदे उध्वस्त केले त्या-त्या पोलीस ठाण्यांचे निरीक्षक आता कारवाईच्या कक्षेत येणे आवश्‍्यक आहेत.त्यांच्यावर कारवाई होणे, किंवा निदान त्यांना मुख्यालयात धाडणे अपेक्षित आहे. इतकेच नव्हे तर त्या-त्या पोलिस ठाण्यातील डीबी पथकातील कर्मचाऱ्यांना पोलीस अधीक्षक मुंडे यांनी त्यांची जागा दाखवावी ही जळगावकारांची अपेक्षा आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here