यावल ः तालुका प्रतिनिधी
यावल-बोरावल रस्त्यावर अवैध गौण खनिज वाहतूक करणारे ट्रॅक्टर यावल पोलीस निरीक्षक सुधीर पाटील व पोलिसांनी पकडून दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल केल्याने वाळू वाहतूक दारांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
यावल-बोरावल-पिंपरी शेळगाव बॅरेज रस्त्यावर नऊ ते दहा किलोमीटर अंतरावर तापी नदी असल्यामुळे तापी नदी परिसरात आणि खोर्यातून, नदी-नाल्यातून अवैध वाळू, माती आणि गाळ वाहतूक यावल बोरावल रस्त्याने रात्रंदिवस सुरू आहे. यावल पासून यावल-बोरावल-शेळगाव बॅरेज-असोदा, भादली मार्गे जळगाव हा फक्त २८ ते ३० किलो मिटर अंतराचा रस्ता आहे. तसेच हा रस्ता गेल्या वर्षी नऊ-नऊ मीटर रुंद अंतराचा डांबरीकरण झाल्याने या रस्त्याने इतर वाहनांची वर्दळ तापी नदीवर पूल नसले तरी मात्र इतर दुचाकी व लहान चार चाकी वाहने तसेच ट्रॅक्टर, डंपर यांची वाहतूक सुरू आहे. याच रस्त्याने यावल सर्कल शेखर तडवी हे आपल्या शासकीय कामानिमित्त दररोज ये-जा करीत असतात. परंतु अवैध गौण खनिज वाहतूक करणारे त्यांना चकवा देऊन दिशाभूल करून अवैध गौण खनिज सर्रासपणे वाहतूक करीत आहे. यावल शहरातील विविध बांधकामाच्या ठिकाणी आणि वीट भट्ट्यांच्या ठिकाणी अनुक्रमे वाळू आणि गाळ येतो कुठून? गाळ वाहतुकीची परवानगी काही प्रमाणात काढली असली तरी रॉयल्टी चुकविण्यासाठी हजारो ब्रास गाळ, वाळू, माती वाहतूक केली जात आहे. याकडे यावल महसूलसह यावल सर्कलचे दुर्लक्ष होत आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, यावल पोलीस निरीक्षक सुधीर पाटील, सहाय्यक फौजदार मुजफ्फर खान पठाण, पो.कॉ.सुशील घुगे, सिकंदर तडवी हे दि.२० एप्रिल रोजी बोरावल-टाकरखेडा परिसरात कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून जनजागृतीसाठी गेले असता बोरावल गावाजवळ ट्रॅक्टर (क्र.एम.१९-०२९६) ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये अवैध वाळू भरून वाहतूक करीत असताना आढळून आले. ट्रॅक्टरवरील चालक विकास कोळी, ट्रॅक्टर मालक श्रीराम सोनवणे (रा.भालशिव) यांना वाळू वाहतुकीचा परवानाबाबत विचारपूस केली असता त्यांनी पोलिसांना उडवाउडवीची उत्तरे देऊन दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांच्याजवळ वाळू वाहतुकीचा परवाना नसल्यामुळे यावल पोलिसांनी ते ट्रॅक्टर ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला आणून रीतसर पंचनामा करून पो.कॉ. राहुल चौधरी यांच्या फिर्यादीवरून यावल पोलीस स्टेशनला भाग-५ गु.र.न.६४/२०२१ भा.द.वि.कलम ३७९,३४ प्रमाणे गुन्हा दाखल केला व दोघ आरोपींना अटक केली. यामुळे वाळू वाहतूकदारांमध्ये खळबळ उडाली आहे.
बोरावल, भालशिव, पिंपरी परिसरातून वाळूसह गाळ, माती व इतर गौण खनिजाची मोठ्या प्रमाणात रात्रंदिवस अवैध वाहतूक सुरू असल्याकडे मात्र महसूलचे दुर्लक्ष होत असून आतापर्यंत किरकोळ स्वरूपाच्या ज्या कारवाया करण्यात आल्या त्यापैकी ठराविकच लोकांवर (ज्यांचे चांगले राजकीय, सामाजिक, आर्थिक संबंध आहेत त्यांना सोडून) महसूल कडून दंडात्मक कारवाई झाल्याने अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. याकडे प्रांताधिकारी कैलास कडलग, तहसीलदार महेश पवार यांनी लक्ष केंद्रीत करून कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.