अमृत, ‘मलनिस्सारण’ची अपूर्ण कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करा

0
1

जळगाव : प्रतिनिधी
‘अमृत’ व ‘मलनिस्सारण’ योजनांतर्गत कामांसंदर्भात माहिती जाणून घेत चर्चेसाठी संबंधित मक्तेदार व पाणीपुरवठा विभागाचे शहर अभियंता, उपअभियंता तसेच प्रकल्प अधिकारी यांची महापौर जयश्री महाजन यांनी आपल्या दालनात बैठक घेतली. त्यामध्ये शहरात प्रभागनिहाय आजवर झालेल्या विविध कामांचा आढावा घेऊन ‘अमृत’ योजनेच्या एजन्सीचे अधिकारी, मक्तेदार, महापालिका अभियंता, उपअभियंता व प्रकल्प अधिकार्यांकडून कामांसंदर्भातील आगामी नियोजनाबाबत सविस्तर चर्चा केली. तसेच विविध अडीअडचणी समजून घेत अपूर्ण राहिलेली सर्व कामे पावसाळा सुरू होण्यापूर्वी कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करा अशा सूचना महापौर जयश्री महाजन यांनी मक्तेदारांसह अधिकार्यांना दिल्या.
याप्रसंगी महापालिका आयुक्त सतीश कुलकर्णी, उपमहापौर कुलभूषण पाटील, अमृत योजनेचे मक्तेदार जैन इरिगेशनचे पंकज बर्हाटे, आशिष भिरूड, श्री.जैन, भुयारी गटार योजनेचे काम करणार्या मक्तेदार एल.सी.इन्फ्रा.प्रा.लि. (गुजरात)चे प्रोजेक्ट इंजिनिअर हसमुख पटेल, शाखा अभियंता अरविंद भोसले, पाणीपुरवठा अभियंता एस.एस.साळुंखे, कनिष्ठ अभियंता योगेश बोरोले, शाखा अभियंता सुनील तायडे, राजेंद्र पाटील पाटील, श्री.भांडारकर, श्री.वन्नेरे, नरेंद्र जावळे, मंजूर खान, संजय नेवे, विकास पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता जगताप, जितेंद्र रंधे, श्री.नेमाडे, प्रकाश पाटील, संजय पाटील, श्री.सोनगिरे, मनिष अमृतकर, शाखा अभियंता (प्रकल्प) लुले, कनिष्ठ अभियंता किशोर चौधरी आदी उपस्थित होते.
महापौर सौ.महाजन यांनी बैठकीच्या सुरूवातीला शहरात सुरू असलेल्या अमृत, मलनिस्सारण तसेच भुयारी गटार योजनेंतर्गत कामांचा आढावा घेतला. त्यात संबंधितांनी शहरातील कोल्हेनगर, चर्चच्या मागील भाग, अयोध्यानगर या भागांत अमृतची कामे जवळपास ९० टक्के पूर्णत्वास आली आहेत. तेथे पाण्याचे कनेक्शनही दिले गेले आहेत. टेस्टिंगचे कामही ८० टक्क्यांपर्यंत पूर्ण झाले आहे. काही कनेक्शनची कामे अपूर्ण आहेत. शहरातील उर्वरित भागांतही जलवाहिनी टाकणे, कनेक्शन देणे, भुयारी गटार योजनेची कामे ८० टक्के पूर्णत्वास आली आहेत. शहरात एकूण ६० हजारांवर पाण्याचे कनेक्शन देणे आहे. मात्र, आजवर ३५ हजार कनेक्शन दिले गेले आहे. काही नागरिकांकडे पाणीपट्टी थकीत असल्याने त्यांना कनेक्शन देणे राहिले आहे. मेहरुण, शिवाजीनगर, निमखेडी शिवार या परिसरासह काही भागांत जलवाहिनी व भुयारी गटार योजनेची कामे काही अडचणींमुळे थांबली आहेत. ‘कोविड-१९’च्या थैमानामुळे आंतराराज्यीय मजूर येथे कामासाठी येण्याकरिता नाखूश आहेत, हीसुद्धा मोठी अडचण आहे, अशी माहिती मक्तेदारांनी दिली.
यावेळी महापौर सौ.महाजन यांनी आयुक्त व उपमहापौरांच्या साक्षीने पावसाळा सुरू होण्याआधी सर्व कामे पूर्ण करा म्हणजे आम्हाला पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांनी रस्त्यांच्या कामांसाठी ‘डीपीडीसी’तून महापालिकेस दिलेल्या ६१ कोटी रुपये निधीतून वर्कऑर्डरप्रमाणे शहरातील रस्त्यांची कामे वेळेत पूर्ण करून जळगावकरांना दिलासा देऊन ऐन पावसाळ्यात होणारी त्यांची अडचण थांबवता येऊ शकेल, असे सांगितले. बैठकीस महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाचा एकही अधिकारी या बैठकीस उपस्थित नसल्याने आयुक्तांसह महापौर, उपमहापौरांनी नाराजी व्यक्त केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here