विहिरीत पडलेल्या हरणाला तरुणांमुळे जीवदान
अमळनेर (प्रतिनिधी)-
तालुक्यातील मंगरूळ शिवारात मोडक्या विहिरीत पडलेल्या हरणाच्या पाडसाला तेथील तरुणांनी जीवाची पर्वा न करता वाचवले.
मंगरूळ येथील कैलास पाटील यांच्या विहिरीवर पाणी भरण्यासाठी गेलेल्या कल्पेश पाटील यांना २ एप्रिलरोजी सकाळी आठ महिन्यांचे हरणाचे पिल्लू पाण्यात धडपडताना दिसले. त्यांनी सरपंच समाधान पारधी यांना माहिती दिली. त्यानंतर तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांना कळवण्यात आले आणि त्यांनी वनविभागाच्या पथकाला पाठवले.
तोपर्यंत मंगरूळ येथील भूषण भदाणे आणि धनंजय पाटील यांनी भीती न बाळगता खोल आणि मोडक्या विहिरीत उड्या घेतल्या. विहिरीत पाणी खूप खोल होते आणि कठडे तुटलेले असल्याने बचावकार्य कठीण झाले होते. दोघांनी हरणाला पकडले, सरपंच समाधान पारधी, दिनेश पाटील, अशोक गोकुळ पाटील, शुभम धनगर, अनिल चव्हाण, कल्पेश पाटील, राजेंद्र पाटील आणि विठ्ठल पाटील यांनी तीन दोर विहिरीत सोडले. हरणाला एका दोराने बांधून वर काढण्यात आले, तर इतर दोरांच्या सहाय्याने दोन्ही तरुणांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले.
हरीण पडल्यामुळे त्याला किरकोळ जखमा झाल्या होत्या. वनरक्षक पी. जे. सोनवणे, रामदास वेलसे, वनमजूर मयूर पाटील आणि समाधान पाटील यांनी हरणाला पशुवैद्यकीय रुग्णालयात नेले, डॉ. संदेश वाटोळे यांनी उपचार केले. त्यानंतर हरणाला पुन्हा जंगलात सोडण्यात आले. या धाडसी बचावकार्यात सहभाग घेतलेल्या तरुणांचे तालुक्यात कौतुक होत आहे. यावेळी अशोक सूर्यवंशी, संजय पाटील आणि खुशाल पाटील उपस्थित होते.
त्याच दिवशी आमोदा येथेही असा प्रकार घडला. गावापासून तीन किलोमीटर अंतरावर मच्छींद्र पाटील यांच्या शेतातील विहिरीत तीन महिन्यांचे हरणाचे पिल्लू पडले होते. पोलीस पाटलांनी वनविभागाला माहिती दिली. मात्र, दुर्दैवाने हे हरण तीन दिवसांपासून पाण्यात अडकल्याने आणि थकल्याने त्याचा मृत्यू झाला होता. कडक उन्हाळ्यात पाण्याच्या शोधात हरणे शिवाराकडे येत आहे. वनरक्षक पी. जे. सोनवणे यांनी शेतकऱ्यांना जंगली प्राण्यांसाठी शेतात पिण्यासाठी पाण्याची सोय करण्याचे आवाहन केले. विहिरींना कठडे लावून अशा दुर्घटना टाळाव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.