Youth murdered : अनैतिक संबंधाच्या वादातून तरुणाचा खून, ५ जणांविरुद्ध गुन्हा

0
54
Oplus_16908288

अनैतिक संबंधाच्या वादातून तरुणाचा खून, ५ जणांविरुद्ध गुन्हा

जळगाव (प्रतिनिधी)-

शहरातील कालिका माता मंदिर परिसरातील श्री प्लाझा परिसरात शनिवारी रात्री तरुणाचा धारदार हत्यारांनी वार करून खून करण्यात आला. ५ संशयित आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस दलाकडून धरपकड केली जात आहे. पत्नीशी असलेल्या अनैतिक संबंधातून झालेल्या वादात हा खून झाल्याची माहिती फिर्यादीतून समोर आली आहे.

आकाश पंडित भावसार (सोनार वय २७, रा. अशोक नगर, जळगाव) असे मयत तरुणाचे नाव आहे. त्याच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. ट्रान्सपोर्ट व्यवसाय करून तो उदरनिर्वाह करत होता.

३ मे रोजी रात्री आकाश याची पत्नी पूजा भावसार हिचा मावस भाऊ अजय मोरे, चेतन सोनार आणि तीन अनोळखी इसम दोन स्कुटीवर आकाशच्या घरी आले. त्यांनी आकाशबद्दल विचारणा केली तेव्हा पूजा हिने आकाशला फोन करून कुठे आहेस ? असे विचारले. आकाशने “श्री प्लाझा, ए वन भरीत सेंटर जवळ” असे सांगितल्यानंतर संशयित आरोपी अजय मोरे, चेतन सोनार आणि इतर तीन जण श्री प्लाझाच्या दिशेने निघून गेले.

त्यानंतर संशयित आरोपींनी श्री प्लाझा परिसरात आकाश भावसार याला घेरून धारदार हत्यारांनी मारहाण केली. त्याच्यासोबत असलेले शैलेश पाटील आणि वैभव मिस्तरी घाबरून गल्लीबोळात पळून गेले. आकाश हा जीव वाचवण्यासाठी रस्त्याच्या पलीकडे पळत गेला. मारेकऱ्यांनी त्याचा पाठलाग करून त्याला पुन्हा धारदार हत्यारांनी गंभीर जखमी केले आणि पळून गेले. यानंतर कुणाल सोनार यांच्या मदतीने आकाश भावसारला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात दाखल करण्यात आले तेथे वैद्यकीय पथकाने तपासून मयत घोषित केले.

आकाश भावसार याची आई कोकिळाबाई भावसार (वय ५४) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शनिपेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आरोपी अजय मोरे हा आकाश भावसार यांच्या घरी अधूनमधून येत होता. त्याचे आकाश याची पत्नी पूजा हिच्या सोबत अनैतिक संबंध होते. यावरून आकाशसोबत अजय याचे वाद झालेले आहेत. त्यामुळे अजय मोरे यानी सूडबुद्धीने त्याच्या साथीदारांसह मिळून त्याला ठार मारले, अशी फिर्याद कोकिळाबाई भावसार यांनी दिलेली आहे. तपास निरीक्षक रंगनाथ धारबळे , सपोनि साजिद मंसूरी करीत आहेत. आकाशला चार दिवसांपूर्वी मारेकऱ्यांनी ठार मारण्याची धमकी दिली होती, अशीही माहिती रुग्णालयात आकाशच्या बहिणीने दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here