युवक काँग्रेसची नवी कार्यकारिणी २ दिवसांत बरखास्त
मुंबई (प्रतिनिधी)-
महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या युवक काँग्रेसमधील हालचालींमुळे खळबळ उडाली आहे. काही दिवसांपासून प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत यांनी घेतलेल्या निर्णयांची चर्चा होत आहे. त्यांनी नुकतीच 276 जणांची कार्यकारिणी जाहीर केली होती, मात्र अवघ्या 48 तासांतच राष्ट्रीय समितीने ही कार्यकारिणी रद्द केली. यामुळे काँग्रेस गोटात खळबळ उडाली आहे.
कुणाल राऊत यांनी कुठलीही परवानगी न घेता तसेच आवश्यक प्रक्रिया पूर्ण न करता ही कार्यकारिणी घोषित केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. यापूर्वी पदमुक्त करण्यात आलेले केतन ठाकरे यांना पुन्हा कार्यकारिणीत स्थान देण्यात आल्याने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. राष्ट्रीय सचिव अजय चिकारा, सहप्रभारी कुमार रोहित आणि एहसान अहमद खान यांनी शिस्तपालन समितीला हस्तक्षेप करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे राऊत यांना पुन्हा धक्का बसला आहे.
कुणाल राऊत हे माजी मंत्री नितीन राऊत यांचे चिरंजीव असून त्यांच्या कार्यकाळात अनेक निर्णय वादग्रस्त ठरले आहेत. नियुक्तीच्या पहिल्या दिवसापासूनच पदाधिकाऱ्यांमध्ये वाद सुरू आहे. लोकसभा निवडणुकीदरम्यान अनेक पदाधिकारी प्रचारात व्यस्त असतानाही त्यांनी काहींना कारणे दाखवा नोटीस बजावल्या, मात्र त्यांच्यावर कोणतीही कारवाई झाली नाही.
नागपूरमध्ये सरसंघचालकांच्या विरोधात राष्ट्रीय अध्यक्ष उदयभानू चिब यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन केल्यानंतर घाईगडबडीत 60 पदाधिकाऱ्यांना पदमुक्त करण्यात आले. काहींना निलंबितही करण्यात आले. चार पदाधिकाऱ्यांनी माध्यमांसमोर भूमिका मांडल्याने त्यांना राऊत यांनी कायमचे बडतर्फ केले होते. पुढील निवडणुकीच्या तयारीसाठी काही पदाधिकाऱ्यांना हटवण्यात आल्याच्या चर्चाही रंगल्या आहेत.
नवीन कार्यकारिणी जाहीर करताना शिवराज मोरे यांना कार्याध्यक्ष नेमण्यात आले होते. मात्र, त्यांच्याकडे कोणतेही अधिकृत अधिकार नसतानाही त्यांनी कार्यकारिणी घोषित केली. यामुळे बुधवारी रात्री राष्ट्रीय नेत्यांनी ही बैठक रद्द करण्याचा निर्णय घेतला. कुणाल राऊत यांना दिलेल्या धक्क्यानंतर पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाकडून पुढील काय पावले उचलली जातात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.