चाळीसगाव : प्रतिनिधी
तालुक्यातील बोढरे शिवारातील शेती खरेदीच्या व्यवहारातील रक्कम परस्पर काढून फसवणूक करून महिलेचा खून केल्याचा आरोपाखाली उच्च न्यायालयाच्या आदेशाने चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला ९ जणांसह अन्य अनोळखी ४ जण असे १३ संशयितांवर उच्च न्यायालयाच्या आदेशाने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बोढरे शिवारातील सोलर कंपनीला जमिनी विकल्या गेल्या त्यात बरेच गुन्हेदेखील दाखल झाले आहेत अशा गुन्ह्यांतील एक संशयित आरोपी गुलाब बाबू राठोड याचेवर अनेक गुन्हे दाखल आहेत तो सोलर कंपनीत ठेकेदार म्हणून काम बघत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
मदन उत्तम राठोड (५४ रा. करगांव तांडा (इच्छापूर) नं. ३, ता. चाळीसगांव. ह.मु. ओम रेसिडेन्सी, नवीन पनवेल आकुली, जि. रायगड) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की अंबीबाई गणेश राठोड (५२ रा बोढरे) यांची बोढरे शिवारात गट न ५९ मध्ये शेतजमीन होती. शेताच्या व्यवहारातील पैशांच्या कारणावरुन त्यांचा खून झाला आहे. अफजलखान पठाण (रा. रांजणगांव ता. चाळीसगांव), दादासाहेब पुंडलिक पाटील, (रा. लोणजे, ता. चाळीसगांव) यांनी अंबिबाई राठोड यांन शिवीगाळ, मारहाण केली व तुला शेतात गाडून टाकू, कोणालाही पत्ता लागणार नाही अशी धमकी दिली.
आरोपी गुलाब राठोड, कैलास उखडू चव्हाण (रा. बोढरे, ता. चाळीसगांव), पुंजाराम रामा धुमाळ (रा. शेंदूर्णी ता. मालेगांव नाशिक) यांनी या शेताच्या व्यवहाराची रक्कम परस्पर काढून फसवणूक केली आहे
अफजलखान पठाण, दादासाहेब पाटील, गुलाब राठोड, कैलास चव्हाण, पुंजाराम धुमाळ, पुंडलिक दौलत पाटील (रा. उंबरखेड ता. चाळीसगांव), भास्कर नरसिंग राठोड (रा. बोढरे ता. चाळीसगांव), संजय प्रकाश जाधवव इतर चार लोक (मयत महिलेला दवाखान्यात नेणारे इसम) यांनी या महिलेची हत्या केल्याचा आरोप आहे.
मृत्युच्या अगोदर या महिलेने ६ सप्टेंबर, २०१७ रोजी जळगावच्या पोलीस अधीक्षकांकडे अर्ज केला होता त्यात ५ सप्टेंबर, २०१७ रोजी तिघांनी त्यांना शिवीगाळ करून तुझा मुडदा पाडू, शेतात गाडून टाकू, कोणालाही पत्ता लागणार नाही, अशी धमकी देवून मारहाण केल्याचे म्हटले आहे. गणेश राठोड पूर्वीपासून दारूच्या व्यसनाधीन होते मनोरुग्णसारखी त्यांची वागणूक होती त्याचा गैरफायदा घेवून आरोपी व गावातील स्थानिक दलालांनी त्यांना दारू पाजून पैशांचा गैरव्यवहार केला.