इच्छुक उमेदवारांची सुरु लगबग आणि धडपड मतदार त्यांना घेणार डोईवर की करणार पडझड

0
32

जळगाव शहर महानगरपालिकेच्या लोकप्रतिनिधींची पाच वर्षाची मुदत संपल्याने आता मनपावर प्रशासक राजवट सुरु झाली आहे.विद्यमान आयुक्त डॉ.विद्या गायकवाड यांचीच प्रशासकपदी नियुक्ती झाली असून त्यांच्याकडून जळगावकरांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत.त्यांनी आयुक्त म्हणून जबाबदारी सांभाळतांना एक कर्तव्यदक्ष अधिकारी अशी आपली प्रतिमा तयार केली आहे. मनपा प्रशासनाला शिस्त लावण्याचे काम करतांना,शहरातील अतिक्रमणालाही आळा घालण्याचे काम त्यांनी केले.विशेष म्हणजे कर्जामुळे मनपाची गेलेली पत पुन्हा प्रस्थापित करण्यात त्यांनी मोलाची कामगिरी केली.कर्मचाऱ्यांचे रखडलेले पगार नियमित व दरमहा करण्यावर त्यांनी भर दिला मात्र मध्यंतरी त्यांचीही अचानक बदली करण्यात आली.हा त्यांच्यासह जळगावकरांनाही धक्का होता.एका चांगल्या अधिकाऱ्यावर हा अन्याय होत असल्याची भावना व्यक्त केली गेली.स्वतः विद्या गायकवाड यांनी या बदलीला मॅटमध्ये आव्हान दिले व त्या जिंकल्या.त्यांनी पुन्हा आयुक्तपदाची सुत्रे सांभाळली.महापौर जयश्रीताई महाजन,आयुक्त डॉ.विद्या गायकवाड मिळून मनपावर महिला राज सुरु होते.आता महापौरांची मुदत संपल्याने मनपावर प्रशासक म्हणून डॉ.विद्या गायकवाड यांच्या रुपाने महिलाराज कायम आहे.त्यांनी शहरातील रस्त्यांचा गंभीर प्रश्न मार्गी लावावा व पावसाळ्यानंतर या कामांना गती कशी देता येईल यादृष्टीने आतापासूनच तयारीला लागावे,अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
जळगाव शहरातील रस्त्यांसह नागरी सुविधांसाठी निधीचे वाटप नुकतेच करण्यात आले.त्यात राज्यातील सत्तारुढ पक्षांच्या नगरसेवकांच्या पदरात जास्त दान टाकण्यात आल्याचे चित्र समोर आले आहे.वास्तविक गेल्या निवडणुकीत जळगावकरांनी भाजपाला ७५ पैकी ५७ जागा देऊन प्रचंड बहुमत दिले होते.नंतर अडीच वर्षानंतर पक्षात उभी फुट पडली व शिवसेनेच्या हाती सत्ता आली.त्यानंतर राज्यात सत्तांतर झाले आणि पुन्हा नगरसेवकांचा एक गट शिंदे गटात सहभागी झाला.मुळात हे नगरसेवक भाजपाच्या तिकीटावर निवडून आले होते,हे विसरता येणार नाही त्यामुळे निधी वाटप करतांना पक्षपातीपणा व्हायला नको होता पण अलिकडच्या काळात राज्ाकारणाची पातळी घसरल्याचे चित्र दिसत आहे.राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी निधी वाटपात सत्ताधारी आमदारांना झुकते माप व विरोधी आमदारांना ठेंगा दाखवला.आपली दादागिरी सिध्द केली.तोच कित्ता जळगाव मनपा विकासकामांच्या निधी वाटपात केला गेला,जो अपेक्षीत नव्हता.सर्व लोकप्रतिनिधींना समान निधी देण्याचा ठराव महासभेत मंजूर होऊनही त्याकडे साफ दुर्लक्ष करण्यात आले आहे.याचे पडसाद आगामी मनपा निवडणुकीत उमटल्याशिवाय राहणार नाही.
आता मनपा निवडणुका कधी होणार,हे कोणीही सांगू शकत नाही.प्रभागातील ओबीसी आरक्षणप्रश्नी सर्वोच्य न्यायालयात सुनावणी सुरु आहे.त्यात ‘तारीख पे तारीख’ दिली जात आहे. अजून ही सुनावणी पूर्ण होऊन कधी निकाल लागेल हे अनिश्चित आहे.त्यामुळे जे इच्छुक गुडघ्याला बाशिंग बांधून तयार होते,त्यांची निराशा झाली आहे.तरीदेखील ते दक्ष आहेत.आपआपल्या प्रभागात जनतेशी जवळीक साधता येईल,असे उपक्रम राबवण्यात येत आहे.गणपती उत्सवातही सहभाग घेऊन,आपला खिसा रिकामा करीत, आपण जनसेवेसाठी तत्पर असल्याचे चित्र संभाव्य उमेदवारांकडून उभे केले जात आहे.नवरात्र व दिवाळीतही अनेक उपक्रम राबवण्यात येईल,यात शंका नाही.चार-साडेचार वर्ष प्रभागात एकदाही चक्कर न मारणारे काही नगरसेवक जळगावात असल्याचा अनुभव जनतेला आला आहे तर बोटावर मोजण्याइतके नगरसेवक सोडले तर बहुतेक नगरसेवकांनी प्रभागातील जनतेची घोर फसवणूक केल्याची प्रतिक्रिया उमटत आहे.आता निवडणूक होणार म्हणून काही नगरसेवकांनी अलिकडेच आपआपल्या प्रभागात गटारी,पथदिवे,रस्ते ही कामे सुरु केली.आपले अस्तित्व असल्याची जाणीव करुन देण्यासाठी ही धडपड आहे,हे सुजाण मतदारांच्या सहज लक्षात येत आहे.आता प्रशासक डॉ.विद्या गायकवाड यांनी स्वतः शहरातील विस्तारीत भागात दौरा करुन,त्या परिसरातील नागरी समस्या समजावून घेऊन त्या त्वरेने कशा सोडविता येतील,यादृष्टीने प्रत्यक्षात पाऊले उचलावीत,जेणे करुन दुर्लक्षित नागरिकांना न्याय मिळू शकेल,अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
दुसरीकडे मावळत्या महापौर जयश्रीताई महाजन व आमदार राजूमामा भोळे यांंच्यात कामाचे श्रेय घेण्याची स्पर्धा लागली आहे.त्यात कोण खरे अन्‌‍‍ कोण खोटे,हे जनतेला सारेकाही माहित आहे.या दोघांमध्ये स्पर्धा लागण्याचे कारण म्हणजे ‘एक देश’ एक निवडणूक’ची चर्चा.लोकसभेबरोबरच विधानसभा निवडणुकाही होण्याची दाट शक्यता लक्षात घेता,आतापासूनच इच्छुकांची पूर्वतयारी सुरु झाली आहे.राजूमामा भेोळे यांना पुन्हा उमेदवारी मिळण्याची खात्री असल्याने त्यांनी जनतेशी संपर्क वाढवण्यासाठी आमदार निधीतून विविध प्रभागात विकासाची विविध कामे हाती घेतली आहेत.ती पूर्ण झाल्यास त्याचा लाभ त्यांना निश्चित मिळू शकतो.ते प्रत्येक कार्यक्रमात हजेरी लावतात.सध्या धार्मिक कार्यक्रमांवर त्यांचा भर असून त्या माध्यमातून ते जनतेशी जवळीक साधत आहेत.
दरम्यान मावळत्या महापौर जयश्रीताई महाजन यांनी मनपातील शेवटच्या दिवशी पायऱ्यांवर नतमस्तक होऊन निरोप घेतांना पत्रकारांशी बोलतांना पक्षश्रेष्ठींनी आदेश दिल्यास विधानसभा निवडणूक लढवण्याची सुप्त इच्छा व्यक्त केली आहे.त्यामुळे त्यादेखील आमदार होण्यासाठी तयारीला लागल्याचे चित्र दिसू लागले आहे.त्यांनी मनपा कारकिर्दीतील अखेरच्या टप्प्यात कामांचा जो धडाका लावला त्यावरुन त्यांची आमदार होण्याची प्रबळ इच्छा अधोरेखीत झाली आहे.त्या सुशिक्षित असून एक महिला म्हणून त्यांनी गेल्या अडीच वर्षात जनमानसात आपल्या कर्तृत्वाची छाप निश्चितच पाडली आहे.शिवसेना ठाकरे गटाला जळगाव शहरची जागा मिळाली आणि मावळत्या महापौर जयश्रीताई महाजन यांना तिकीट मिळाले तर राजूमामा भोळे यांंच्याशी त्यांची लढत काट्याची होऊ शकते,असे राजकीय जाणकारांचे मत आहे.राजकारणात कधी काय होईल,हे सांगता येत नाही.भाजपानेही यावेळी आमदारांना तिकीट देतांना त्यांनी केलेल्या कामांचा लेखाजोखा घेतला असून मेरीटवर उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे भाजपा राजूमामांना तिसऱ्यांदा पुन्हा संधी देणार की,पक्षातील नव्या चेहऱ्याला मैदानात उतरवणार,यावर सारेकाही अवलंबून आहे.भाजपाकडून निवडणूक लढवण्यासाठी अनेक इच्छुक आहेत तर शिवसेना ठाकरे गटाकडूनही जयश्री महाजन यांच्यासह विष्णू भंगाळे यांच्याही नावाची चर्चा आहे.देशासह राज्यात आता एनडीए विरुध्द इंडिया अशी लढत होणार असल्याने इंडियामधील कोणत्या पक्षासाठी जळगावची जागा मिळते,यावर पुढील राजकीय गणित अवलंबून आहे. त्यात माजीमंत्री व जळगावचे ९ वेळा आमदार राहिलेले सुरेशदादा जैन हे प्रत्यक्ष मैदानात उतरणार नसले तरी त्यांचे आशिर्वाद ज्यांच्या पाठिशी राहतील त्या उमेदवाराचे पारडे जड राहिल,यात शंका नाही.जळगाव ग्रामीणची जागा इंडियाच्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडे जाण्याची दाट शक्यता आहे कारण या मतदार संघात विद्यमान पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याशी कडवी झुंज देण्यासाठी माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी वर्षाभऱापासून कंबर कसली असून त्यादृष्टीने ग्रामीण़ भागातील जनतेशी जनसंपर्क वाढवला आहे.त्यांच्या उमेदवारीला पक्षश्रेष्ठींकडूनही हिरवा कंदील मिळाल्याचे चित्र दिसत आहे.त्यामुळे जळगाव शहरची जागा शिवसेना ठाकरे गटाकडे जाण्याची दाट शक्यता आहे.त्यामुळे जळगावात भाजपा व शिवसेना ठाकरे गटातच लढत रंगणार असे चित्र आजतरी दिसत आहे.
एकंदरीत मनपा असो की,लोकसभा किंवा विधानसभा निवडणूका.सर्व इच्छुकांना वेध लागले आहे.त्यासाठी ते गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहेत.आपल्याला तिकीट मिळेल म्हणून पक्षश्रेष्ठींकडे जिल्ह्यातील नेत्यांमार्फत लग्गा लावण्याची धडपड सुरु झाली आहे.या धडपडीत आपल्या प्रभागातील,विधानसभा क्षेत्रातील,लोकसभा क्षेत्रातील मतदारांना विविध कामांच्या माध्यमातून आमिष दाखवण्याची लगबग सुरु झाली आहे.आता नवरात्रौत्सव व दिवाळी तोंडावर आली आहे.त्यामुळे लोकप्रतिनिधींना पुन्हा खिसा खुला करावा लागणार आहे.प्रथम मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना आणि नंतर दिवाळीत जनतेला खुष करावे लागणार आहे.त्यातून मतांंचे दान आपल्या पारड्यात पाडून घेण्याची त्यांची युक्ती किती प्रमाणात फत्ते होते,हे तर निवडणूक निकालानंतरच स्पष्ट होईल.तोपर्यंत मतदारही सोयीस्करपणे चुप्पी साधतील आणि आपला कौल मतपेटीव्दारे देतील.मतदारांनी कोणाला पसंती दर्शवली आहे आणि कोणाला धक्का दिला आहे ते मतदानयंत्रे खुलल्यावर पारडे नेमकं कुठे झुकले हे समजणार आहे.तोपर्यंत सबका साथ ‘सबका विकास’ चा लाभ घ्यायचा आणि इच्छुक उमेदवारांनाही मैदानात उतरवण्यासाठी प्रोत्साहीत करुन आपल्या तालावर नाचवायचे. इच्छुक उमेदवार जेवढे हुशार,चलाख त्यापेक्षा मतदार जास्त हुशार व चलाख त्यामुळेच म्हणावे लागेल ‘सब गोलमाल है भाई’ सब गोलमाल है’

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here