गुवाहाटी : वृत्तसंस्था
सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ पाकिस्तानचा मोठा विक्रम मोडू शकतो. ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरू असलेल्या पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेत भारताने २-० अशी आघाडी घेतली आहे. यासह ‘मेन इन ब्लू’ने सर्वाधिक टी-२० आंतरराष्ट्रीय सामने जिंकणाऱ्या पाकिस्तानची बरोबरी केली आहे. आता भारतीय संघ सामना जिंकताच हा एक नवीन विक्रम आपल्या नावावर करेल तसेच, या सामन्यात विजय मिळवताच ऑस्ट्रेलियाविरुद्धची पाच सामन्यांची टी-२० मालिका देखील जिंकेल.
क्रिकेटच्या सर्वात लहान फॉरमॅटमध्ये पाकिस्तानने सर्वाधिक १३५ विजयांची नोंद केली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या टी-२० सामन्यात जेव्हा भारतीय संघ गुवाहाटीच्या बारसापारा मैदानावर उतरेल तेव्हा पाकिस्तानच्या या विक्रमावरही नजरा असतील. तिरुअनंतपुरमच्या ग्रीनफील्ड क्रिकेट स्टेडियमवर रविवारी भारताने दुसरा टी-२० सामना ४४ धावांच्या फरकाने जिंकला. या विजयासह त्याने पाकिस्तानच्या टी-२० विक्रमाची बरोबरी केली. आता फक्त एक सामना जिंकून भारतीय संघ हा इतिहास रचू शकतो.भारताने क्रिकेटच्या सर्वात लहान फॉरमॅटमध्ये एकूण २११ सामने खेळले आहेत. ऑस्ट्रेलियाविरुद्धचा नुकताच भारताचा १३५ वा विजय होता. त्याच वेळी, पाकिस्तानने आतापर्यंत २२६ टी-२० सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्यांनीही १३५ विजय नोंदवले आहेत. भारतीय संघाने पाकिस्तानचा हा विक्रम सर्वात कमी सामन्यांमध्ये गाठला आहे. जर भारताने गुवाहाटी येथे होणारा सामना जिंकला तर ते पाकिस्तानपेक्षा कमी सामन्यांमध्ये हा विक्रम मागे टाकतील.