तुरुंगात जाईन पण माफी अजिबात मागणार नाही

0
23

मुंबई : प्रतिनिधी

ठाकरे गटाच्या उपनेता सुषमा अंधारे यांच्यावर अलीकडेच विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांची बदनामी केल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. नागपूरमध्ये सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनावेळी विधानपरिषदेच्या सभागृहात याची गंभीर दखल घेण्यात आली होती. या मुद्यावरुन भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी सुषमा अंधारे यांच्यावर हक्कभंगाच्या कारवाईचा प्रस्ताव मांडला होता. त्यावरील चर्चेअंती सुषमा अंधारेंनी येत्या आठ दिवसांत दिलगिरी पत्र दिले नाही तर त्यांच्यावर हक्कभंग प्रस्ताव दाखल करण्याची परवानगी देऊ, असा इशारा विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी दिला होता. त्यामुळे सुषमा अंधारे या सगळ्यावर काय भूमिका मांडणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते.
अखेर सुषमा अंधारे यांनी एका जाहीर पत्राद्वारे आपली भूमिका सविस्तरपणे मांडताना माफी मागण्यास नकार दिला आहे. माझ्याकडून एखादा गुन्हा घडला असता तर मी बिनशर्त माफी मागितली असती पण पक्षीय राजकारणातील कुरघोडीचा भाग म्हणून कोणी मला झुकवू पाहत असेल तर मी ते कदापि सहन करणार नाही.भलेही यासाठी कारवाईचा भाग म्हणून मला तुरुंगवास पत्करावा लागला तरीही माझी तयारी आहे, असे सुषमा अंधारे यांनी ठणकावून सांगितले आहे. त्यामुळे आता सुषमा अंधारे यांच्याविरुद्ध कारवाईचा बडगा उगारण्यात येणार का, हे पाहावे लागेल.
माझ्या कृतीला अपराध ठरवण्याची अहममिका सत्ताधारी पक्षांच्या सदस्यांकडून सुरू आहे. सभागृहाची सभापती पदाची गौरव गरिमा वगैरे शब्द उच्चारले जात आहेत. पण संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर किंवा या राज्याची राष्ट्राची आधारशीला ठेवणारे छ. शिवाजी महाराज, म. गांधी , महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज या महापुरुषांचा अपमान जेव्हा मनोहर कुलकर्णी उर्फ भिडे किंवा सरकार दरबारमध्ये मंत्री असणारे चंद्रकांत जी. पाटील करत होते तेव्हा याच सभागृहाच्या सभापती पदावरील जबाबदार व्यक्तींनी त्यांच्यावर हक्कभंग का आणला नाही, असा सवाल सुषमा अंधारे यांनी उपस्थित केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here