अहमदाबाद : वृत्तसंस्था
भारतीय संघ आयसीसी एकदिवसीय विश्वचषक संघाच्या अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाला भिडणार आहे. फलंदाजांची दमदार कामगिरी, वेगवान गोलंदाजांचा भेदक मारा, त्यांना फिरकीपटूंची साथ यांच्या जोरावर भारताने सलग १० सामने जिंकले आहेत. यंदाच्या स्पर्धेत टीम इंडिया अजिंक्य आहे. तर दुसऱ्या बाजूला स्पर्धेतील पहिले दोन सामने गमावलेल्या कांगारुंनी सलग ८ सामने जिंकले आणि अंतिम फेरी गाठली. भारतीय कर्णधार रोहित शर्मा आणि ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिंग्स यांनी आज विश्वचषकाच्या करंडकासोबत फोटो सेशन केले. गांधीनगरच्या जवळ असलेल्या अदालज विहीर परिसरात फोटो सेशन झाले.
२०११, २०१५ आणि २०१९ मध्ये झालेल्या विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्याआधीही फोटोशूट झालं होतं. विशेष म्हणजे या तिन्हीवेळा करंडकाच्या उजव्या बाजूस उभ्या असलेल्या कर्णधारांनीच अंतिम सामना जिंकला. २०११ मध्ये महेंद्रसिंह धोनी आणि श्रीलंकेचा कुमार संगकारा करंडकाच्या अनुक्रमे उजव्या आणि डाव्या बाजूस उभे होते. तेव्हाचा अंतिम सामना धोनीच्या नेतृत्त्वात भारतानं जिंकला होता. विशेष म्हणजे तेव्हाची स्पर्धा भारतातच झाली होती.२०१५ मध्ये ऑस्ट्रेलियानं विश्वचषक स्पर्धा जिंकली. तर २०१९ मध्ये इंग्लंडनं बाजी मारली. या दोन्ही वेळा फोटो सेशनमध्ये ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडचे कर्णधार करंडकाच्या उजव्या बाजूस उभे होते. विशेष म्हणजे जिंकणारे दोन्ही संघ मायदेशात खेळत होते. गेल्या तीन स्पर्धांकडे पाहिल्यास दोन योगायोग स्पष्ट दिसतात. ज्या संघाचा कर्णधार करंडकाच्या उजव्या बाजूस उभा राहिला, तेच संघ अंतिम फेरीत जिंकले आणि दुसरा योगायोग म्हणजे तिन्ही स्पर्धा यजमान देशानंच जिंकल्या आहे.
अंतिम सामन्यातील पंच
अवघ्या काही तासांत एकदिवसीय क्रिकेटमधील नवी चॅम्पियन मिळणार आहे. भारताला तब्बल एक दशकानंतर विश्वचषक जिंकण्याची संधी आहे, त्यामुळे या सामन्याकडे सर्वांच्याच नजरा नरेंद्र मोदी स्टेडियमवर लागल्या आहेत.आयसीसीने या महाअंतिम सामन्यासाठी रिचर्ड इलिंगवर्थ, रिचर्ड केटलबरो या दोन इंग्लंडच्या अंपायर्सवर मैदानी पंच ही जबाबदारी देण्यात आल्याचे आयसीसीने सांगितले आहे. वेस्ट इंडीजचे जोएल विल्सन आणि न्यूझीलंडचे क्रिस्टोफर गॅफनी हे फायनलसाठी तिसरे आणि चौथे पंच असतील. तर, झिम्बाब्वे अँडी पायक्रॉफ्ट सामनाधिकारी असतील.