वरणगाव : प्रतिनिधी
शहरातील मुख्य रस्त्यावर असलेल्या एका मोठ्या व्यापारी संकुलातुन दिवसा ढवळ्या गुटखा सर्रासपणे लहान – मोठ्या दुकानदारांना होलसेल भावात विक्री केला जात आहे . मात्र, या प्रकाराकडे पोलीस तसेच अन्न व औषध प्रशासन विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने या ” गुटखा किंग ” विक्रेत्याची चांगलीच मुजोरी वाढली असुन या गुटखा किंगला पाठबळ कुणाचे ? असा प्रश्न निर्माण झाला आहे .
मानवी शरीराला घातक असलेल्या व कॅन्सर सारख्या आजाराला आमत्रंण देणाऱ्या रसायन मिश्रीत गुटख्याची विक्री तसेच निर्मितीला महाराष्ट्र राज्यात बंदी घालण्यात आली आहे . तसेच अवैधरित्या विक्री करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे शासनाने पोलीस तसेच अन्न व औषध प्रशासनाच्या विभागाला सक्त आदेश दिले आहेत . मात्र, राज्यात या आदेशाची संबधीत विभागाकडुन आर्थिक बळावर पायमल्ली होत असल्याने परराज्यातुन मोठ्या प्रमाणात सुगंधीत तंबाखुच्या नावाखाली गुटख्याची तस्करी केली जात आहे. घातक रसायन मिश्रीत विमल गुटखा सेवनाच्या आहारी असंख्य युवा वर्ग गेल्याने या गुटख्याची दिवसेंदिवस मागणी वाढत असल्याने अवैधरित्या गुटखा विक्रीच्या या गोरख धंद्यात अनेकजण सक्रीय होत असून युवा वर्गाच्या जिवाशी खेळ करून आपली तिजोरी पैशाने भरीत असल्याचे दिसून येत आहे. यामध्ये वरणगांव शहरातील मुख्य रस्त्यावर असलेल्या एका मोठ्या व्यापारी संकुलातील गुटखा किंग व्यापाऱ्याचा समावेश असुन या संकुलातुन शहर व परिसरातील इतर लहान – मोठ्या दुकानदारांना दिवसा ढवळ्या अवैधरित्या विमल गुटखा पाकीटांचा पुरवठा केला जातो. असा हा गुटखा किंग सर्वृत झाला असून सुद्धा पोलीस तसेच अन्न व औषध प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने या गुटखा विक्रेत्या किंगला खऱ्या अर्थाने पाठबळ कुणाचे ? असा प्रश्न निर्माण झाला असून संबधीत विभागाने गुटख्याची किरकोळ प्रमाणात विक्री करणाऱ्या दुकानदारांना वेठीस न धरता घाऊक ( होलसेल ) गुटखा विक्री करणाऱ्या ” किंग ” वरच कठोर कारवाई करून गुटखा तस्करीची पायमुळेच नष्ट करण्यात यावे अशी मागणी होत आहे .
चार चाकी वाहनांद्वारे
गुटख्याची होते आयात !
शहर व परिसरात मोठ्या प्रमाणात गुटखा विक्रीचा जोर वाढल्याने मध्य प्रदेश व लगतच्या तालुक्यातुन चारचाकी (ओमनी ) वाहनाद्वारे शहरात गुटख्याची खुलेआम आयात केली जात असून दुचाकीद्वारे परिसरातील ग्रामिण भागातही वितरीत केला जात आहे . याबाबत कारवाईची कुणकुण लागताच गुटखा किंगचे ” पंटर ” सजग होवून प्रशासनाच्या हालचालींची बित्तम – बात खबर गुटखा किंग पर्यंत पोहचवितात . त्यामुळे कारवाई होणापूर्वीच गुटख्याची सोयीस्करपणे विल्हेवाट लावली जात असल्याने कारवाईसाठी गेलेल्या प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना रिकाम्या हाताने माघारी फिरावे लागते. तर संबंधीत प्रशासनाकडून केवळ ” छापा ” टाकण्याचा देखावा तर दाखविला जात नाही ना? असाही प्रश्न निर्माण होत आहे .
युवा वर्गाचे पालक झाले हतबल
मानवी शरीराला घातक ठरत असलेल्या रसायन मिश्रीत गुटखा सेवनाच्या आहारी बहुतांश युवा वर्ग बळी पडत असल्याने त्यांचे पालक हतबल झाले आहेत . यामुळे बंदी असुनही सहजरीत्या उपलब्ध होत असलेल्या अवैध गुटखा विक्रीच्या कारवाईकडे पोलीस तसेच अन्न व औषध प्रशासनाने प्रामाणिकपणे कठोर कारवाईची अपेक्षा सर्वांना लागली आहे . यासाठी प्रशासनाने शासनाच्या आदेशाचे काटेकोर पालन करीत कुठल्याही दबावाला बळी न पडता अवैधरित्या गुटखा विक्री करून मालामाल झालेल्या विक्रेत्यांवर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे .
वरीष्ठांनी दखल घेण्याची
आवश्यकता
वरणगांव व परिसरात अवजड (कंटेनर ) तसेच इतर चारचाकी वाहनाद्वारे मोठ्या प्रमाणात गुटख्याची आयात होत असल्याचे नुकतेच भुसावळ व मुक्ताईनगर येथे वरीष्ठांच्या आदेशावरून पोलिसांनी केलेल्या कारवाईतून समोर आले आहे . याच प्रकारची कारवाई वरणगांव शहरात झाल्यास शहरवासीयांना दिलासा मिळेल यासाठी वरीष्ठ अधिकारी यांनी जातीने लक्ष घालून राजकीय पाठबळ असलेल्या या गुटखा किंगवर कठोर कारवाईकडे शहरवासीयांचे लक्ष केंद्रित झाले आहे .