कोलंबो : वृत्तसंस्था
लोकेश राहुलचे धडाकेबाज कमबॅक आणि विराट कोहलीची दणकेबाज फटकेबाजी पाहण्याचा योग पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात आला.राहुलने यावेळी दणक्यात कमबॅक केले आणि टीकाकारांना चोख उत्तर दिले. दुसरीकडे विराटही धमाकेदार फटकेबाजी करत होता. या दोघांच्या दमदार शतकांच्या जोरावर भारताने काल ३५६ धावांचा डोंंगर पाकिस्तानला विजयासाठी ३५७ धावांचे मोठे आव्हान देत विजयाचा मार्ग सुकर केला आहे.
राहुल आणि विराट या दोघांनीही यावेळी आपली शतके पूर्ण करत भारताच्या धावसंख्येला चांगला आकार दिला.या दोघांनी यावेळी २३३ धावांची द्विशतकी नाबाद भागीदारीही रचली. भारताने यावेळी ३५६ धावांचा डोंगर रचला.कोहलीने १२२, तर राहुलने १११ धावांची नाबाद खेळी साकारली.
पावसामुळे आजच्या राखीव दिवशी खेळाला सुरुवात झाली तेव्हा पाकिस्तानचे गोलंदाज भन्नाट मारा करत होते. त्यामुळे आता भारताच्या धावा कशा होणार, हा प्रश्न चाहत्यांना पडला होता पण पावसामुळे खेळपट्टीची मदत पाकिस्तानच्या गोलंदाजांना सुरुवातीला मिळाली. त्यामुळे त्यांंचे चेंडू चांगले स्विंग होत होते.राहुल आणि विराटसाठी हा कठीण काळ होता पण हा कठीण काळ या दोघांनी संयमीपणे खेळून काढला पण एकदा सेट झाल्यावर मात्र या दोघांनी पाकिस्तानच्या गोलंदाजीचा चांगलाच समाचार घेतला. राहुल हा कोहलीपेक्षा सुरुवातीला जास्त आक्रमक दिसत होता. त्यामुळे त्याचे अर्धशतक पहिले झाले पण कोहली सुरुवातीला शांत वाटत असला तरी सेट झाल्यावर मात्र त्याने एकामागून एक फटक्यांची माळ लावली. त्यामुळे कोहलीने कधी अर्धशतक झळकावले ते समजलेच नाही. अर्धशतकानंतर या दोघांनी शतकाच्या दिशेने कूच केली.
राहुलने यावेळी फटकेबाजी करत आपल्या वनडे क्रिकटमधील २००० धावा पूर्ण केल्या दुसरीकडे कोहलीने १३ हजार धावांचा टप्पा पार करीत विक्रम नोंदवला.